Fri, May 24, 2019 21:17होमपेज › Konkan › कलंबिस्त ग्रा. पं. शिपायाची गळफास लावून आत्महत्या

कलंबिस्त ग्रा. पं. शिपायाची गळफास लावून आत्महत्या

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 10:40PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

कलंबिस्त ग्रामपंचायतीचे शिपाई सदानंद शांताराम जाधव (40) यांनी गुरुवारी मध्यरात्री 2.30 वा.च्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे सदानंद यांचे काही दिवसांपूर्वी ग्रामसेवकपदी  निवड झाली होती.  ग्रामसेवक म्हणून नियुक्ती झाल्यावर अन्य ठिकाणी बदली होणार या चिंतेतून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

सदानंद कदम कलंबिस्त ग्रा. पं. मध्ये गेली पंधरा वर्षे शिपाई पदावर कार्यरत होते.मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे कलंबिस्तसह परिसरात चांगले संबंध होते. गुरुवारी रात्री कामावरून परतल्यावर त्याचे घरच्यांशी बोलणेही झाले होते. त्यानंतर घरातील अन्य सदस्य दुसर्‍या खोलीत झोपले होते. याच दरम्यान रात्री 2.30 वा.च्या सुमारास कदम यांनी घरात असलेल्या बाजूच्या खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. 

शुक्रवारी सकाळी हा प्रकार त्यांच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्यावर ही घटना उघडकीस आली. सदानंद याने गळफास लावल्याचे बघताच घरच्यांनी हंबरडा फोडला. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन मुले, पत्नी असा परिवार असून याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच पं.स.सभापती रवींद्र मडगावकर, सरपंच शरद नाईक यांच्यासह ग्रामस्थांनी कुटीर रुग्णालयात धाव घेतली.

ग्रामसेवकपदी झाले होते प्रमोशन....

सदानंद याला चार दिवसांपूर्वी ग्रामसेवकपदी प्रमोशन झाल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाले होते. 17 मे रोजी प्रमोशन होणार असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सदानंद यांना सांगण्यात आले होते. प्रमोशन मिळाले तर  अन्य ठिकाणी बदली होणार. कलंबिस्त ग्रा.प.मध्ये एवढी वर्षं काम केल्यावर अन्य ठिकाणी ग्रामसेवक म्हणून काम कसे करणार या चिंतेतून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.