Thu, Jul 18, 2019 06:24



होमपेज › Konkan › पदवीधरची निवडणूक होणार चौरंगी?

पदवीधरची निवडणूक होणार चौरंगी?

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 8:25PM



दापोली : प्रतिनिधी

कोकण पदवीधर विधानसभा निवडणुकीसाठी  राष्ट्रवादी - भाजप यांच्यात प्रमुख लढत होईल, असे असतानाच या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला ओळखला जातो. परंतु, गेल्यावेळी हा मतदार संघ राष्ट्रवादीने हिरावून घेतला होता. भाजपच्या  पारंपरिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे निवडून आले होते. मात्र, आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी  देऊन ते भाजपत दाखल झाले आहेत.  त्यांची भाजपकडून उमेदवारी निश्‍चित झाली आहे.

त्यामुळे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे तयारीला लागले आहेत. परंतु, या मतदारसंघात शिवसेना उमेदवार उभा करण्याच्या तयारीत  असून सेनेतर्फे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम, माजी महापौर संजीव मोरे, माजी पालकमंत्री भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव या युवा कार्यकर्त्यांची  नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडून शेखर निकम, रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांची नावे चर्चेत आहेत.  काँग्रेस पक्षाकडूनसुद्धा उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे.

परिणामी आगामी निवडणूक जिंकणे  कोणत्याही उमेदवाराला सोपे जाणार नसून ही निवडणूक पहिल्यांदाच चौरंगी होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, पुढील दोन-तीन दिवसांत उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असल्याने पुढील एक ते दोन दिवसांत उमेदवारीबाबतचा निर्णय पक्‍का होईल.

कारण या निवडणुकीत शिवसेना पूर्ण क्षमतेने उतरण्याच्या तयारीत आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत शिवसेना  पक्षाकडून  मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात आली आहे. भाजपनेसुद्धा ही मोहीम जोरदारपणे राबवली आहे. भाजपने नावनोंदणी केलेल्या मतदारांचा फायदा डावखरे यांना होण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनीही वैयक्‍तिक पातळीवर मतदार नोंदणी केल्यामुळे याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो.राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे  भाजपसमोर कोण उमेदवार द्यायचा? हा प्रश्‍न राष्ट्रवादीसमोर आहे. या मतदारसंघात 97 हजार मतदार आहेत.

प्रतिष्ठेसाठी लढत

पालघर लोकसभा पोट निवडणुकीपाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकसुद्धा सेना - भाजपकडून प्रतिष्ठेची होणार आहे. भाजपसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असेल. राष्ट्रवादी काँग्रेसलाही जागा टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस हे चारही प्रमुख पक्ष पदवीधर विधान परिषदेसाठी आपापले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याने ही निवडणूक फारच रंगतदार होणार आहे.