Tue, Jul 16, 2019 10:06होमपेज › Konkan › पदवीधर मतदारसंघ; आज मतमोजणी

पदवीधर मतदारसंघ; आज मतमोजणी

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 11:17PMसिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी या मतदारसंघासाठीची मतमोजणी नवी मुंबई येथील आग्री कोळी सांस्कृतिक भवन येथे सकाळी 8 वा.पासून होणार असून, या पदवीधर मतदारसंघाच्या आमदारकीची माळ मतदारांनी कुणाच्या गळ्यात घातलीय, हे निश्‍चित होणार आहे.

या निवडणुकीसाठी एकूण 14 उमेदवार रिंगणात असून विजयाची माळ कुणाच्या गळ्यात मतदार टाकतात, याकडे आता राजकीय पक्षांसह सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. गुरुवारी दुपारपर्यंत या मतदारसंघासाठीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील सत्तेत असलेल्या आणि नियमित भांडत असलेल्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार दिल्याने, तसेच या मतदारसंघावर सत्ता असलेले राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षानेही आपला उमेदवार देत या वेळच्या निवडणुकीत वेगळीच रंगत आणली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे उमेदवार निरंजन डावखरे हे भाजपला जाऊन मिळाल्याने ही आपली जागा टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसने कंबर कसली होती. तर सेना व भाजप या पक्षांनी आपलाच उमेदवार निवडून यावा यासाठी ही निवडणूक आपापल्या प्रतिष्ठेची केली होती.

कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यावर विविध पक्षांनी आपला उमेदवार जाहीर करून त्यांच्या प्रचारासाठी जिल्हा दौरे आयोजित केले होते. तर काही पक्षांनी निश्‍चित उमेदवारांना आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला होता. तसेच आपल्या पक्षाचा उमेदवार कसा चांगला आहे त्याला का मतदान करावे याबाबत प्रबोधन करत होते. या निवडणुकीसाठी भाजपाकडून निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नाजिब मुल्ला, शिवसेनेतर्फे संजय मोरे आणि  अपक्ष उमेदवार ही निवडणूक लढवित होते. या मतदार संघासाठी सोमवारी 25 रोजी जिल्ह्यातील वैभववाडी, देवगड, शिरगाव, पडेल, कासार्डे, कणकवली, फोंडा, आचरा, मालवण, मसुरे, कट्टा, कडावल, कुडाळ, ओरोस, माणगाव, वेंगुर्ला, शिरोडा, मळेवाड, सावंतवाडी, बांदा, दोडामार्ग या 21 मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया संपन्न झाली. या 21 मतदान केंद्रावरून जिल्ह्यातील 5308 मतदारांपैकी 3091 पुरुष व 1583 महिला अशा एकूण 4674  मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्‍क बजावला आहे. सिंधुदुर्गातून या निवडणुकीसाठी 88.06 टक्के एवढे मतदान झाले होते.