Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Konkan › शासनाची दडपशाही; काँग्रेस जनतेसोबत : दलवाई

शासनाची दडपशाही; काँग्रेस जनतेसोबत : दलवाई

Published On: Apr 21 2018 11:15PM | Last Updated: Apr 21 2018 11:07PMराजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पाला सुमारे 95 टक्के लोकांचा विरोध असताना शासन जनमत डावलून बळजबरीने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाच्या या दडपशाहीच्या विरोधात काँग्रेस पक्ष स्थानिक जनतेच्या बाजूने असून समृद्ध कोकण नष्ट करणारा प्रकल्प या ठिकाणाहून हटविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील, असे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रवक्‍ते व राज्यसभा सदस्य खासदार हुसेन दलवाई यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

नाणारला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रकल्पग्रस्त भागाचा दौरा केला. येथील जनतेच्या भावना समजून घेतल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खा. दलवाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

यावेळी खा. दलवाई म्हणाले, काँग्रेसचा विकासाला विरोध नाही, मात्र सर्व प्रदुषणकारी प्रकल्पच कोकणच्या माथी मारण्यात येत असल्याने रिफायनरी प्रकल्प नाणार गावी राबवण्यास आमचा ठाम विरोध असल्याचे खासदार दलवाई यांनी सांगितले. आम्ही प्रकल्पाकरिता प्रस्तावित सिंधुदुर्गातील गिर्ये, रामेश्‍वरसह नाणार परिसरातील दहा गावांमध्ये भेट देऊन प्रकल्पग्रस्तांची भूमिका जाणून घेतली. यामध्ये प्रसंगी प्राण देऊ पण प्रकल्पासाठी एक इंचसुद्धा जागा देणार नाही, एवढी टोकाची भूमिका प्रकल्पग्रस्तांची असल्याचे खा.दलवाई यांनी सांगितले.

शासनाच्या 2013 च्या कायद्यानुसार जर 75 टक्के लोकांची सहमती असेल तरच प्रकल्प राबविता येतो. मात्र, रिफायनरी प्रकल्पाला सुमारे 95 टक्के लोकांचा विरोध असतानाही शासन हा प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे शासनच आपल्या कायद्याचे उल्‍लंघन करत असल्याचा आरोप दलवाई यांनी केला. प्रकल्प परिसरातील जमीन ओसाड असल्याचे शासन सांगत आहे. मात्र, याठिकाणी सुमारे 12 लाख हापूस, 6 लाख काजू कलमे तर 6 कोटी इतर झाडे आहेत. त्यामुळे शासन खोटे सांगत आहे. याठिकाणी होणारी रिफायनरी ही इतर रिफायनरींच्या तुलनेत कितीतरी पटीने मोठी असणार आहे. त्यामुळे याठिकाणी होणारे प्रदूषणही तसेच असणार आहे. काँग्रेस पक्षाचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध नाही, हा प्रकल्प कोकणात राबविण्यास विरोध आहे. कारण ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत केमिकल प्रकल्पच आहेत. त्यामुळे प्रदूषणकारी प्रकल्पच कोकणात का? जर कोकणचा विकास करायचाच असेल तर याठिकाणी उपलब्ध साधन सामग्रीवर आधारित पर्यटन, फळप्रक्रिया असे प्रकल्प उभारावेत, असेही खा.दलवाई यांनी सांगितले.

या दौर्‍यामध्ये खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेना व भाजपवर जोरदार आसूड ओढले. या दोन्ही पक्षांची भूमिका जनतेची दिशाभूल करणारी आहे व यामागे केवळ मतांचे राजकारण आहे. काँग्रेस पक्षाला कोकणच्या जनतेची काळजी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही तेल रिफायनरी स्वीकारली जाणार नाही, असे खा. दलवाई म्हणाले.

दरम्यान, या दौर्‍याचा सर्व अहवाल प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांना सादर करण्यात येणार असून वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. यावेळी माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार हुस्नबानू खलिफे, प्रदेश प्रवक्‍ते हरीष रोग्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

जमीन खरेदीचे गौडबंगाला : खा. दलवाई

प्रकल्प परिसरातील सुमारे साडेपाचशे एकर जमिनीची खरेदी झाली आहे. मोदी, शहा, मेहता, जैन अशा लोकांनी ही जमीन खरेदी केल्याचे पुढे आले आहे. ज्यावेळी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांनी या जमीन खरेदीची चौकशी केली, त्यावेळी रिफायनरी प्रकल्प होणार असल्याची माहिती समोर आली. या जमीन खरेदीमागील नेमके गौडबंगाल काय? असा सवाल खा. दलवाई यांनी उपस्थित केला.