होमपेज › Konkan › ‘बेटी बचाव’ कार्यक्रमात शासकीय नियम पायदळी!

‘बेटी बचाव’ कार्यक्रमात शासकीय नियम पायदळी!

Published On: Dec 11 2017 1:31AM | Last Updated: Dec 10 2017 9:04PM

बुकमार्क करा

मालवण : प्रतिनिधी

शासनाच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या कार्यक्रमाच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका संस्थेने खासगी वृत्त वहिनीच्या माध्यमातून आपलीच प्रसिद्धी केली आहे.  शासनाचे नियम व प्रोटोकॉल पायदळी तुडवण्यात आले आहेत. या गंभीर प्रकाराची दाखल मालवण तालुका भाजपने घेतली असून केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे याबाबत तक्रार केली जाणार आहे. तर कार्यक्रमाच्या संपूर्ण आयोजनाची व झालेल्या खर्चाच्या चौकशीची मागणी केली जाणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली.

शासनाचा ‘बेटी बचाव, बेटी पढाव’  कार्यक्रम एका संस्थेच्या माध्यमातून  मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात घेण्यात आला.  यासाठी शासकीय निधी  खर्च झाला. महिला सक्षमीकरण हा मुख्य हेतू यात होता. 

तालुकावार गाव पातळीवर कार्यक्रम होणे अपेक्षित होते. महिला मुलींमधे जनजागृती अपेक्षित होती. मात्र कार्यक्रमाची मूळ संकल्पना बाजूला ठेवत त्या संस्थेने आपली प्रसिद्धी अधिक केली.  स्थानिक खासदार या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणे अपेक्षित असतांना त्याबाबत खासदारांचा वेळ घेऊन त्यांना निमंत्रित करण्यात आले नाही. कार्यक्रमाची प्रसिद्धी योग्य पद्धतीने न झाल्याने शहरातून काढण्यात आलेली फेरी व मुख्य कार्यक्रमास अत्यल्प प्रतिसाद लाभला. असा आरोप केनवडेकर यांनी केला.

केंद्रीय अधिकार्‍यांकडे तक्रार करणार

शासनाच्या या कार्यक्रमात संस्थेने आपला स्वार्थ साधला आहे. त्यामुळे याची तक्रार केंद्रीय अधिकार्‍यांकडे केली जाणार आहे.  या कार्यक्रमासाठी किती शासन निधी प्राप्त झाला व खर्च किती याची सखोल चौकशी व्हावी याची मागणी केंद्रीय अधिकार्‍यांकडे करणार असल्याचे केनवडेकर यांनी सांगितले.

पंतप्रधानांचा उल्लेख नाही!

केंद्र शासनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असताना कार्यक्रमात राजकारण नको असे अपेक्षित होते. असे असताना कार्यक्रम पत्रिकेत राजकीय नावे घुसडली गेली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख दिसलाच नाही, असा आरोपही  केनवडेकर यांनी केला आहे.