होमपेज › Konkan › मच्छीमारांचा सरकारला १०० दिवसांचा ‘अल्टीमेटम’

मच्छीमारांचा सरकारला १०० दिवसांचा ‘अल्टीमेटम’

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 12 2018 10:32PMमालवण :प्रतिनिधी 

अनधिकृत परप्रांतीय ,पर्ससीन तसेच एलईडी लाईट मासेमारी विरोधातील पारंपरिक मच्छिमारांचा लढा आता अंतिम टप्प्यात आला असून त्याची तीव्रता वाढविणार आहे. एलईडी लाईट मासेमारी बंदी अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र अंमलबाजवणी कक्ष स्थापनेसाठी सरकारला 100 दिवसांचा अल्टीमेटम देण्याचा निर्णय  आजच्या बैठकीत घेण्यात आला. समुद्र किनार्‍याजवळ होणारे परप्रांतीय मच्छीमारांचे अतिक्रमण तसेच जिल्ह्यात चालू असलेली अनधिकृत मिनी पर्ससीन मासेमारीवर निर्बंध आणण्यात  मत्स्यखाते अपयशी ठरलेले आहे. अंमलबजावणी होत नसल्यास अध्यादेशांचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला. अनधिकृत मासेमारी करताना सापडून आलेल्या नौका कायमस्वरूपी तातडीने सील करण्यात याव्या व अनधिकृत मासेमारी करणार्‍या नौका पकडून देणार्‍या मच्छीमारांवर गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणी करण्यात  आजच्या बैठकीत करण्यात आली.

महाराष्ट्र सरकारने एलईडी लाईट मासेमारी बंदीबाबत अध्यादेश काढलेल्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख मच्छीमार नेत्यांची बैठक मालवण येथे  पार पडली. एलईडी लाईट बंदी अध्यादेशाबद्दल समाधान व्यक्‍त करतानाच अध्यादेशांची ठोस अंमलबजावणी होत नसल्याने तीव्र नाराजी उपस्थित मच्छिमारांनी व्यक्‍त केली. 

पर्ससीन,परप्रांतीय तसेच एलईडी लाईट मासेमारीवर प्रतिबंध करण्यासाठी ‘स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष’ साठी सरकारने तातडीची पावले उचलावीत यासाठी सरकारला 100 दिवसांचा अल्टीमेटम देण्याचा निर्णय  आजच्या बैठकीत घेण्यात आला. 

सन 2014 साली केंद्र आणि राज्य सरकारमध्ये झालेल्या परिवर्तनामध्ये पारंपरिक मच्छिमारांचा महत्वाचा वाटा होता. हे सरकारने विसरू नये तसेच गरज पडल्यास पारंपारिक मच्छीमार पुन्हा एकदा परिवर्तनाची हाक देऊ शकतो असा इशारा सरकारला देण्यात आला. सन 2014 मध्ये कोकणातल्या प्रकल्पग्रस्तांची मोट बांधण्यात श्रमिक मच्छिमारांनी पुढाकार घेतला होता. पुन्हा एकदा सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र आणण्यासाठी लवकरच पावले उचलावीत असे सुचविण्यात आले. एलईडी लाईट वादाच्या वेळी पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या  वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात आली. तसेच मुंबई येथे होणार्‍या सीआरझेड बैठकीमधील मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी बैठकीसाठी श्रमिक मच्छीमार  संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, बाबी जोगी, संजय केळूसकर, राजू कुर्ले, मिथुन मालंडकर, मच्छीमार युवा नेते अन्वय प्रभू, श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, आचरा बंदर संघटनेचे प्रमोद वाडेकर, देवगड येथील मच्छीमार नेते धर्माजी आडकर, नॅशनल फिश वर्कर्स फोरमचे रविकिरण तोरसकर, ज्येष्ठ मच्छीमार नेते रमेश धुरी व जिल्ह्यातील इतर   संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.