Wed, Apr 24, 2019 11:40होमपेज › Konkan › ‘नाणार’बाबत सरकार संभ्रमी : सुनील तटकरे

‘नाणार’बाबत सरकार संभ्रमी : सुनील तटकरे

Published On: May 03 2018 11:22PM | Last Updated: May 03 2018 11:17PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

केंद्रातील शिवसेनेचे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना कोकणवासीयांना मानवणारा एखादा उद्योग गेल्या चार वर्षांत आणता आला नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आ. सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. हे काम त्यांच्यासाठी जरा अवघडच आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही आसूड ओढले. ‘नाणार’बाबत या सरकारने संभ्रमी वातावरण निर्माण केल्याचे ते म्हणाले.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आ. तटकरे गुरुवारी रत्नागिरीत आले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, युवा नेते अजित यशवंतराव रायगड जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर उपस्थित होते.

तटकरे म्हणाले, राज्यातील युती सरकारकडे बहुमत आहे. परंतु, बहुमताच्या संख्याबळाकडे विचाराची सुसंगती नाही. त्यामुळे एकाला नाणार रिफायनरी हवी आहे तर दुसर्‍याला नकोय. ज्या सेनेला आता नाणार नकोय त्यांची प्रारंभाची भूमिका वेगळीच होती. उद्योगमंत्री देसाई यांनी या प्रकल्पासाठी भूसंपादन अधिसूचना काढली. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रकल्पाला हिरवा कंदिल दिला. पण तेच उद्योगमंत्री नाणार येथील जाहीर सभेत अधिसूचना रद्द केल्याचे सांगतात. मुख्यमंत्री यावर हे अधिकार उद्योगमंत्र्यांना नाही म्हणतात. मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प हवाय, अशी ही बहुमतातल्या सरकारमध्ये विसंगती असल्याचे आ. तटकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेची दुटप्पी आणि धरसोड वृत्ती यातून पुढे येते. स्थानिक जनतेला बरे वाटावे म्हणून काही तरी घोषणा करायच्या. भाजप नेत्यांनी त्या खोडून काढायच्या, असा कारभार सुरू आहे. राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना कोकणात रासायनिक प्रकल्प नको, अशी भूमिका घेतली होती. याची आठवण करून दिली. आचारसंहिता असल्याने आ. तटकरे यांनी विकासात्मक प्रश्‍नांना उत्तरे दिली नाहीत.
अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीचा मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनिल तटकरे यांनी शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच पराभव मान्य केल्याचे म्हटले. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी 464 मते मिळवून शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल, असे सांगितले. प्रत्यक्षात एकूण 941 मते असल्याने 470 मतांपेक्षा अधिक मते मिळवणारा उमेदवारच विजयी होणार आहे. याचा अर्थ ना. गीते यांना किती मतदार आहेत हेच माहीत नाही, असेही ते मेळाव्यात बोलताना म्हणाले.

राष्ट्रवादी हॅट्ट्रीक करेल

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी हॅट्ट्रीक करेल, असा विश्‍वास आ. तटकरे यांनी व्यक्‍त केला. मागील दोन टर्म अनिल तटकरे यांनी बाजी मारली. आता अनिकेत तटकरे विजयी होऊन हॅट्ट्रीक होईल, असे ते म्हणाले. नारायण राणे मोठे नेते आहेत. त्यांच्यासह नितेश, निलेश राणे यांची भेट घेतली असून, येत्या दोन दिवसांत ‘स्वाभिमान’ची भूमिका स्पष्ट होईल, असेही आ. तटकरे यांनी यावेळी सांगितले.