Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Konkan › शासकीय रुग्णालयाचेच आरोग्य बिघडतेय!

शासकीय रुग्णालयाचेच आरोग्य बिघडतेय!

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 9:59PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : योगेश हळदवणेकर

जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्ग 2 ची 30 पदे मंजूर असून त्यातील 24 पदे ही भरण्यात आलेली आहेत. त्यातीत 6 पदे रिक्त आहेत, मात्र विनापरवानगी गैरहजर राहणार्‍या 7 वैद्यकीय अधिकारी आणि प्रतिनियुक्तीवर गेलेल्या एका वैद्यकीय अधिकार्‍यामुळे प्रत्यक्ष 15 जणच कार्यरत आहेत. त्यामुळे निम्म्या पदांवरील वैद्यकीय अधिकारी रूग्णांना सेवा देत आहेत. तर निम्म्या पदांवरील वैद्यकीय अधिकार्‍यांची मनमानी शासकीय रुग्णालयाचे आरोग्य बिघडवत आहे.

जिल्हा रूग्णालयातील वर्ग 2 मधील भिषकची दोन्ही पदे रिक्त आहेत. बालरोग तज्ज्ञांची तीन मंजूर पदांपैकी  दोन पदे रिक्त आहेत. येथे एका पदावर डॉ. श्याम पाटील कार्यरत आहेत. शल्य चिकित्सकांच्या दोन पदांपैकी डॉ. ज्ञानेश विटेकर हे कार्यरत असून एक पद रिक्त आहे. स्त्री रोग तज्ज्ञांपैकी डॉ. भाग्यश्री काकडे या कार्यरत असून डॉ. मधुकर शिंदे व डॉ. विलास पाटील हे विनापरवानगी गैरहजर राहिले आहेत.

भूलतज्ज्ञांपैकी डॉ. मंगला चव्हाण कार्यरत आहेत तर डॉ. प्रफुल्ल पाचपांडे विनापरवानगी गैरहजर असल्याने भूलततज्ज्ञांचा प्रश्‍न आवासून आहे. अस्थीरोग तज्ज्ञांपैकी डॉ. प्रमोद सुर्यवंशी हे कार्यरत असून डॉ. निलेंद्र भोळे विनापरवानगी गैरहजर आहेत. नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून डॉ. सोनाली पाथरे आणि डॉ. वनिता कानगुले या कार्यरत आहेत. नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. पराग पाथरे, शरीर विकृती तज्ज्ञ डॉ. राजश्री ढवळे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अतुल ढगे हे कार्यरत आहेत. तर क्ष-किरण तज्ज्ञ पद रिक्त आहे.रक्तसंक्रमण अधिकारी पद प्रतिनियुक्ती दिल्याने रिक्त आहे.

अपघात वैद्यकीय अधिकारी 9 मंजूर पदांपैकी डॉ. डी. एम. झुंझारराव, डॉ. विकास कुमरे, डॉ. सुरेंद्र सुर्यगंध, डॉ. रविंद्र ढाकणे, डॉ. लिना कुंभारे हे कार्यरत आहेत. तीन डॉक्टर अनधिकृत गैरहजर राहिल्याने तिघांच्या सेवासमाप्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. तर एका डॉक्टरचे निलंबन झालेले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष 5 जण कार्यरत असून 4 पदे रिक्तच आहेत. 14 डॉक्टरांच्या मनमानीमुळे 15 पदांवरील डॉक्टरांवर कामाचा भार पडत आहे. त्यामुळे या 14 पदांवर पुन्हा नव्याने डॉक्टर नेमण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

नर्सिंगचीही 27 पदे रिक्‍तच 

जिल्हा शासकीय रुग्णालयाला 131 नर्सिंग स्टाफ मंजूर आहे. त्यात 104 पदे भरण्यात आलेली आहेत. तर 27 पदे रिक्त आहेत. परिसेविकांची सर्वाधिक 15 पदे रिक्त आहेत. सध्या शासकीय रूग्णालयाची शुश्रुषा ही नर्सिंग स्टाफवर अवलंबून आहे. अधिपरिचारिकांच्या 5 मंजूर पदांपैकी 4 पदे रिक्त आहेत. मनोविकृती परिचारिका 3 पदांपैकी 2 रिक्त आहेत. त्यामुळे ही महत्वाची पदेही भरण्याची गरज आहे.