Wed, Apr 24, 2019 16:21होमपेज › Konkan › गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक घोषित

गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक घोषित

Published On: Aug 03 2018 10:40PM | Last Updated: Aug 03 2018 10:05PMशृंगारतळी : वार्ताहर

कोकण किनारपट्टीवर गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे असलेला ऐतिहासिक गोपाळगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे या किल्ल्याची डागडुजी व संवर्धन करणे शक्य होणार आहे. इतिहासप्रेमींच्या आग्रही मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने गोपाळगडला न्याय दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 1660 साली आदिलशहाकडून गोपाळगड किल्ला जिंकून घेतला. त्याकाळी दाभोळ खाडीमध्ये चालणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला वापरण्यात येत असे. त्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या किल्लेदारांनी व हुकुमशाहांनी आपल्या पद्धतीने या गडाची बांधणी व डागडुजी केली. इंग्रजांच्या काळात या गडाची विक्री करण्यात आली व अंजनवेल येथील मणियार या गृहस्थाने हा किल्ला विकत घेतला आणि किल्ल्यावर आंबा कलमाची झाडे लावली. या गडाच्या प्रवेशद्वारावर ही खासगी मालमत्ता आहे नुकसान करू नये असा असलेला फलक गडप्रेमी व पर्यटक यांना अचंबित करणारा होता. ऐतिहासिक किल्ला खासगी मालकाकडे कसा? असे प्रश्‍न उपस्थित केले जायचे.  महाराष्ट्रातील अनेक गडप्रेमींंनी  हा गड खासगी मालकाच्या ताब्यातून मुक्‍त करा, अशी  मागणी सातत्याने केली होती. 

1660 नंतर आलेल्या अनेक किल्लेदारांनी किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरूज यांची डागडुजी  केली. त्याचप्रमाणे या किल्ल्यावर आजही धान्य कोठारे व विहिरी सुस्थितीत आहेत. गेली अनेक वर्षे या गडाची कोणत्याही प्रकारची डागडुजी झाली नसली तरीही किल्ल्यावरील तटबंदी व बुरूज आजही मजबूत अवस्थेत आहेत. या तटबंदीवरून आजुबाजूच्या समुद्राचे विहंगम द‍ृश्य नजरेत भरते. किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूला दीपस्तंभ आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी येथील पुरातत्व विभागामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, राजापूरचा यशवंत गड पालघर येथील शिरगावचा गड, पूर्णगड बाणकोटचा किल्ला, रेड्डी येथील यशवंत किल्ल्याची डागडुजी सध्या सुरू आहे. आता गोपाळगड देखील संरक्षित स्मारक झाल्याने हा किल्ला संरक्षित होणार आहे. यामुळे त्याची डागडुजी व सुशोभिकरणावर निधी खर्च करणे शक्य होणार असून भविष्यात पुरातत्त्व खात्याच्या नावावर होण्याची प्रक्रियादेखील सुरू होण्याची अपेक्षा आहे. या किल्ल्यावर दरवर्षी शिवप्रेमींकडून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे शिवप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे.