होमपेज › Konkan › बांबू लागवडीतूनही येणार शेतकर्‍यांना अच्छे दिन

बांबू लागवडीतूनही येणार शेतकर्‍यांना अच्छे दिन

Published On: Jun 01 2018 2:06AM | Last Updated: May 31 2018 8:45PMकणकवली : प्रतिनिधी

100 टक्के अनुदानावरील फळझाड योजनेतून कोकणातील पडिक जमिनीचा कायापालट झाला आणि शेतकर्‍यांचे अर्थकारण बदलले. या फळझाड लागवडीबरोबरच आता बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  वनविभागही यावर्षी त्यांच्या वनक्षेत्रात 1 लाख बांबूची लागवड करणार आहे. सिंधुदुर्गात बांबू लागवडीला पोषक वातावरण असून अद्यापही मोठ्या प्रमाणावर असलेल्या पडिक जमिनीवर शेतकर्‍यांनी बांबू लागवड करणे आवश्यक आहे. फळझाडांच्या उत्पन्नाप्रमाणेच बांबू लागवडीतूनही शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडणार आहे. 

माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना 1990-91 साली रोजगार हमी योजनेंतर्गत 100 टक्ेकअनुदानातून फळ झाड लागवड योजना लागू केली आणि कोकणातील पडिक जमिनीवर गेल्या 26-27 वर्षात नंदनन फुलले. आंबा, काजू, नारळ, चिकू, जांभूळ, रतांबा अशी विविध प्रकारची फळझाडे पडिक जमिनीवर लावण्यात आली. ही झाडे आता उत्पादनक्षम झाली असून शेतकर्‍यांचे अर्थकारणच  बदलून गेले आहे. अद्यापही सामाईकपैकी मोठ्या प्रमाणावर पडिक जमीन शिल्लक आहे. तसेच कमी झालेल्या मनुष्यबळामुळे भातशेतीचे प्रमाणही आता घटत चालले आहे.

या पार्श्‍वभूमीवर बांबू लागवडीचा पर्यायही आता शेतकर्‍यांसमोर आहे. सिंधुदुर्गात या बांबू लागवडीला पोषक असे वातावरण आहे. विशेषत: माणगा जातीची बांबू लागवड अधिक फलदायी आहे. यातून मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. बांबूला मोठी मागणी असून फळझाड लागवडीच्या तुलनेत कमी कष्टामध्ये अधिक किफायशीर अशी ही लागवड आहे. 

जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी बांबू लागवडीला आता सुरूवातदेखील केली आहे. त्यासाठी कृषी आणि वनविभागाने पुढाकार घेवून बांबूची रोपे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.यावर्षी वनविभाग जवळपास 1 लाख बांबुची लागवड वनक्षेत्रात करणार आहे. वनविभागाने यापूर्वी त्यांच्या क्षेत्रात निलगिरी, साग, सुरू, जांभूळ अशा अनेक वृक्ष जातींची लागवड केली आहे. 

2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्या अंतर्गत जवळपास 6 लाख वृक्ष लागवड जिल्ह्यात झाली. तर 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये सिंधुदुर्गात्र 13 लाख 69 हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे. या वृक्षलागवडीसाठी शासकीय आणि खासगी रोपवाटिकांमध्ये जवळपास 46 लाख विविध प्रजातींची रोपे उपलब्ध आहेत. जिल्ह्यात वनविभागाच्या 31, सामाजिक वनीकरणच्या 25 व इतर खाजगी मिळून 156 रोपवाटीका आहेत. 1 जुलै ते 31 जुलै या दरम्यान वृक्ष लागवड जिल्ह्यात करण्यात येणार आहे.

यामध्ये आपल्या वनक्षेत्रात 6 लाख 25 हजार वृक्ष लागवड करणार आहे. तर सामाजिक वनीकरण विभाग 1 लाख वृक्ष लागवड करणार आहे. ग्रामपंचायती आपापल्या कार्यक्षेत्रात 2 लाख 82 हजार वृक्ष लागवड करणार आहेत आणि उर्वरीत 3 लाख 43 हजार वृक्ष लागवड विविध  शासकीय खात्यांच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले. गेल्या दोन वषार्ंत जी लागवड केली त्या लागवडीच्या संवर्धनाचे प्रमाण 80 टक्के इतके समाधानकारक असल्याचे ते म्हणाले.

वृक्ष लागवडीअंतर्गत आंबा, काजू, नारळ, कोकम, जांभूळ अशा विविध फळझाडांबरोबरच साग, बांबू,विविध औषधी वनस्पती आणि अशा अनेक फळझाडांची लागवड जिल्ह्यात होणार आहे. इतर प्रांताच्या तुलनेत सिंधुदुर्गात चांगली वनसंपदा आहे. या वृक्षलागवडीच्या माध्यमातनू ही वनसंपदा अधिक समृध्द होण्यास हातभार लागणार आहे.

जिल्ह्यात 46 लाख विविध प्रजातींची रोपे उपलब्ध

ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्‍वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. 2016 मध्ये राज्यासाठी 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. सिंधुदुर्गात त्यावर्षी सुमारे दीड लाख वृक्ष लागवड करण्यात आली होती.