Wed, Jul 24, 2019 12:26होमपेज › Konkan › ‘गोमेकॉ’त सिंधुदुर्गातील ‘इमर्जन्सी’ रूग्णांसाठी शुल्क नाही!

‘गोमेकॉ’त सिंधुदुर्गातील ‘इमर्जन्सी’ रूग्णांसाठी शुल्क नाही!

Published On: Jan 05 2018 1:15AM | Last Updated: Jan 05 2018 12:08AM

बुकमार्क करा
कणकवली : प्रतिनिधी

गोव्यात मोठया प्रमाणावर गोवा बाहेरील लोकसंख्या वाढल्याने तेथील शासनाने बाहेरील रूग्णांवर मेडिकल हॉस्पिटलमध्ये शुल्क आकारणी सुरु केली आहे. असे असले तरी या रूग्णालयात जाणारे सिंधुदुर्गातील 95 टक्के रूग्ण हे ‘इमर्जन्सी’ असतात. त्यांच्याकडून कोणतीही शुल्क आकारणी केली जात नाही. उर्वरित रूग्णांकडून केवळ 50 ते 100 रू. एवढी नाममात्र आकारणी केली जाते.गोव्यातील आरोग्यमंत्र्यांशी आपली याबाबत चर्चा झाली आहे, त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेने भयभित किंवा विचलित होवू नये,  असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले.

कणकवलीतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युवानेते संदेश पारकर उपस्थित होते. अलिकडेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी गोमेकॉतील शुल्क आकारणीवरून प्रमोद जठार आणि पालकमंत्र्यांना लक्ष्य केले होते. त्यासंदर्भात प्रमोद जठार म्हणाले, आपण गोव्याचे आरोग्यमंत्री ना.राणे यांच्याशी चर्चा केली. सिंधुदुर्गातून अ‍ॅडमिट होणार्‍या इमर्जन्सी रूग्णांकडून एकही रूपयाही शुल्क आकारले जात नाहीत. तसे आकारले गेल्यास आपणास तात्काळ कळवावे. 

संबंधित रूग्णाचे पैसे परत दिले जातील. त्यामुळे सिंधुदुर्गांतील रूग्णांनीही अशी काही तक्रार असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रमोद जठार यांनी केले. अर्थात जिल्हयातील रूग्णांना गोव्यात पाठवावे लागते याचे आम्हाला शल्यच आहे.  गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये सिंधुदुर्गच्या रूग्णांसाठी स्वतंत्र कक्ष कायमस्वरूपी स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. मात्र आपला सतीश सावंत यांना सवाल आहे की, तुम्ही 25 वर्षे सत्‍तेत होता, मग  जिल्हयाची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी का प्रयत्न केला नाही? असे सांगत जठार म्हणाले रूग्णसेवा ही ईश्‍वरी सेवा आहे त्यात कोणतीही अडचण येवू देणार नाही. 
कणकवलीतील महामार्ग प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे  प्रयत्न करत आहोत. प्रकल्पग्रस्तांना रेडीरेकनरनुसार दर देण्याचे शासनाने मान्य केले आहे. तसेच ग्रामीण निकषाप्रमाणे दोन गुणांकानुसार चौपट भरपाई शहरीभागासाठीही मिळावी, अशी आमची मागणी आहे. शुक्रवारी या संदर्भात आम्ही महसूल मंत्र्यांची भेट घेणार आहोत, जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू करू देणार नाही, असे जठार म्हणाले. 

आजच्या प्राथमिक शिक्षक समितीच्या मेळाव्यात शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्‍न मार्गी  लावण्याची ग्वाही दिली आहे. त्याबद्दल आपण दोन्ही मंत्र्यांना धन्यवाद देतो, असेही प्रमोद जठार म्हणाले. 

.....तर राणे यांनी आरोग्य यंत्रणा सक्षम का केली नाही?

राज्याचे आरोग्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे मुळात आरोग्यसंबंधी प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी त्यांची आहे. जिल्हयात भाजपचा एक तरी आमदार किंवा मंत्री असता तर आम्ही शासनाकडे भांडू शकलो असतो. आमच्या रूग्णांना गोव्यात जावे लागते हे शल्य आहेच. पण आम्हाला जाब विचारणारे सतीश सावंत यांचे नेते नारायण राणे हे 25 वर्षे सत्‍तेत होते, मंत्री होते, त्यांनी जिल्हयाची आरोग्य यंत्रणा सक्षम का केली नाही? असा सवाल युवानेते संदेश पारकर यांनी केला. जिल्हयात शासकीय मेडिकल कॉलेज होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,असे ते म्हणाले.