Mon, Jun 24, 2019 16:56होमपेज › Konkan › ‘गोकूळ’चे दूध संकलन अचानक बंद

‘गोकूळ’चे दूध संकलन अचानक बंद

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 18 2018 10:36PMओरोस : प्रतिनिधी

जिल्ह्यातील दूध संस्थांकडील गाईच्या दूधाची उचल गोकूळने बंद केल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या प्रश्‍नी न्याय मिळावा यासाठी 27 जून रोजी स. 10 वा. ओरोस येथे श्री रवळनाथाला दूधाचा अभिषेक करून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन छेडण्यात येणार आहे,  अशी माहिती जिल्हा बंँकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी दिली. 

जिल्ह्यात 2013 पासून गोकूळ दूध संस्थे कडून दूध संकलने केले जाते. आठ दिवसांपूर्वी या संस्थेने स्थानिक दूध विकास संस्थांकडील गाईचे दूध घेणे अचानक बंद केले. यामूळे दररोज सुमारे साडेपाच हजार लिटर दूध वाया जात आहे. दूध व्यावसायाला वाढता प्रतिसाद पाहून जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी बँकेकडून कर्ज घेऊन गायी- म्हैसी खरेदी केल्या आहेत.  

मात्र दूध खरेदी बंद झाल्याने या कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? गायींच्या वैरणीचा व खाद्याचा खर्च कसा भागवायचा?, कुटुंब कसे चालवायचे? असे अनेक सवाल दूध उत्पादक शेतकर्‍यां समोर निर्माण झाले आहेत. ‘गोकूळ’च्या या निर्णया मुळे जिल्ह्यातील हजारो दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याप्रश्‍नी यासनाने न्याय न दिल्यास 27 जून रोजी ओरोस  रवळनाथ मंदिर येथे 10 वा. रवळनाथाला दूधाचा अभिषेक करत हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले जाणार आहे. 

गोवा शासन गाईच्या दुधाला 25 ते 30 रू.प्रति लिटर दर देते. तर गोकूळ केवळ 22 रू. दराने दूध खरेदी करते. हा आर्थिक भार सहन करून शेतकरी दूध  गोकूळकडे पाठवित होते. असे असताना काही दिवसांपूर्वी गोकूळच्या संचालक मंडळाने सिंधुदुर्गातील दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची पूर्व कल्पनाही त्यांनी येतकर्‍यांना दिलेली नाही. गोकूळच्या व्यवस़्थापनाने याचा  विचार करावा, याबाबत शासनानेही दखल घ्यावी व  दूध उत्पादकांना न्याय द्यावा. अशी येतकर्‍यांची मागणी असल्याचे श्री. सावंत म्हणाले. मनिष दळवी, सुगंधा साटम आदींसह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.