होमपेज › Konkan › सिंधुदुर्गवासीयांना पूर्ववत मोफत सेवा 

सिंधुदुर्गवासीयांना पूर्ववत मोफत सेवा 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

दोडामार्ग : प्रतिनिधी

गोवा-बांबोळी रुग्णालयात सोमवार, दि. 2 एपिलपासून सिंधुदुर्गवासीयांना पूर्ववत मोफत आरोग्य सेवा देण्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी मान्य केले. यासाठी रुग्णालयात एक स्वतंत्र खिडकी उभारण्यात येणार आहे. ना. विश्‍वजित राणेंचे हे लेखी पत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आंदोलकांना दिल्यानंतर वृद्ध महिलांना पाणी देऊन या उपोषणाची सांगता झाली. अखेर दोडामार्गवासीयांच्या जनआक्रोश आंदोलनाला तब्बल 10 दिवसांच्या लढ्यानंतर यश आले. 

गोवा-बांबोळी रुग्णालयात सिंधुदुर्गवासीयांना पूर्ववत मोफत आरोग्य सेवा मिळावी, तसेच तालुक्यात आरोग्याच्या मूलभूत सेवा उपलब्ध व्हाव्यात आदी मागण्यांसाठी दोडामार्गवासीयांनी 20 मार्चपासून  तहसील कार्यालयासमोर  जनआक्रोश आंदोलन सुरू केले होते. गेले दहा दिवस हे आंदोलन मोठ्या निर्धाराने सुरू होते. दरम्यान, या आंदोलनाचेे लोण सिंधुदुर्ग जिल्हाभरात पसरले. 

गुरुवारी पणजी-मीरामार येथे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पं. स. सदस्य बाळा नाईक, उपाध्यक्ष शंकर देसाई यांनी भेट घेतली. या भेटीत प्रदीर्घ चर्चा झाली. या शिष्टमंडळात जनआक्रोश कोअर कमिटीचे सदस्य व महिलाही सहभागी झाल्या होत्या. यावेळी गोवा-बांबोळी व म्हापसा  जिल्हा रुग्णालय येथे येणार्‍या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना पूर्वीप्रमाणे मोफत रुग्ण सेवा देण्याचे ना. राणेंनी मान्य केले.   जिल्ह्यात 3 लाखांपेक्षा अधिक केशरी, पिवळी रेशनकार्डधारक आहेत. त्यांना मोफत सेवा सुरू होणार आहे. गोव्यातील हा पहिला प्रश्‍न मी सांगितल्याप्रमाणे सोडविला आहे. अन्य तुमच्या सर्व मागण्या येत्या काही दिवसांत पूर्ण केल्या जातील, असे आश्‍वासन जठार यांनी दिले.  

बुधवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी भेट घेतली होती. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. यावेळी प्रदेश चिटणीस राजन तेली, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर उपस्थित होते. या बैठकीत महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत गोव्याला विमा कंपनीकडून  रक्‍कम दिली जाणार असल्याचे ठरले होते. ही योजना गोवा राज्याला जोडण्यात येईल. यानुसार गुरुवारी भाजप शिष्टमंडळाने गोवा आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना मोफत सेवा देण्याचे ठरविण्यात आले. सिंधुदुर्ग आरोग्य मित्र ही स्वतंत्र खिडकी सोमवारपासून जिल्हावासीयांना खुली केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट करत तसे लेखी पत्र शिष्टमंडळाला दिले.


  •