Sat, Jul 20, 2019 15:26होमपेज › Konkan › ‘कोयने‘चे पाणी गुहागरला द्या

‘कोयने‘चे पाणी गुहागरला द्या

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 10:27PMचिपळूण : प्रतिनिधी

कोयनेचे वीजनिर्मिती झाल्यानंतरचे वाशिष्ठी नदीतून वाया जाणारे पाणी कालव्याद्वारे गुहागर तालुक्यात फिरविल्यास गुहागर तालुक्यात समृद्धी येईल. तालुक्याला बेरोजगारीचा मोठा शाप आहे. या पाण्यामुळे शेती, बागायती व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाला चालना मिळून गुहागरचे आर्थिक चित्र बदलेल, अशी मागणी येथील उद्योजक राजन दळी यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

ना. गिरीष महाजन यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, कोयनेचे वाया जाणारे पाणी गुहागरात आर्थिक समृद्धी आणेल. सध्या कोयनेच्या पाण्याद्वारे आरजीपीपीएल प्रकल्पाला पाईपलाईनद्वारे पाणी पाठवले जाते. ही पाईपलाईन सध्या गंजली आहे. त्यामुळे मार्चनंतर प्रकल्पाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यासाठी लाखो रूपये खर्च होतात. आरजीपीपीएलमध्ये महिन्यातून एक किंवा दोनवेळा पाणी सोडून स्टोरेज करण्यात येते. त्यामुळे आजुबाजूच्या अंजनवेल, वेलदूर, धोपावे, रानवी या गावांना पाण्याचा उपयोग होत नाही. शिरळ ते अंजनवेल पाईपलाईनवर गेली अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी टॅप मारून बेकायदेशिररित्या नळ जोडण्या होत्या. या नळजोडण्या एमआयडीसीने तोडल्या आहेत. 

दरम्यान, या परिस्थितीचा विचार करता गंजलेली पाईपलाईन बदलणे आवश्यक आहे. तसेच येथील नागरिकांना पिण्यासाठीही एमआयडीसी पाणी द्यायला तयार नाही. त्यामुळे या पाण्याचा पूर्वीकडील दुष्काळी भागात वापर व्हावा. यासाठी कोयना ते अंजनवेल अशा कालव्याद्वारे येणारे पाणी जनतेस देणे आवश्यक आहे. 

पुढाकाराची गरज

गुहागर तालुक्याला अशाप्रकारे पाणी उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागात भाजीपाला व शेतीच्या माध्यमातून येथील गरीब जनतेचा आर्थिक विकास होऊ शकतो. पर्यटनाबरोबरच लोकांच्या हाताला शेतीच्या माध्यमातूनही रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कोयना ते अंजनवेल या कालव्याच्या आग्रही मागणीसाठी लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी तसेच सर्व समाजसेवी संस्थांनीही  पुढे यावे, असे आवाहनही राजन दळी यांनी केले आहे.