Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Konkan › शिक्षक भरतीत स्थानिकांना आरक्षण द्या

शिक्षक भरतीत स्थानिकांना आरक्षण द्या

Published On: Apr 29 2018 11:14PM | Last Updated: Apr 29 2018 11:14PMरत्नागिरी : प्रतिनिधी

शिक्षक भरती सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच गुण वाढवून देण्यार्‍या रॅकेटने राज्यभरात खळबळ उडाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातले असे बोगस शिक्षक कोकणात नको. त्यांना आम्ही रूजू करून घेणार नाही, वेळप्रसंगी याविरोधात तीव्र आंदोलन छेडू. विदर्भ, मराठवाड्याचे शिक्षक कोकणात लादण्यापेक्षा आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के आरक्षण द्या, अशी मागणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग डीएड्, बीएड्धारक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी संघटनेचे संदीप गराटे, प्रभाकर धोपट, आशिष वासावे, शरद पावसकर, देवधर भातडे, विनायक बिजम, कल्पेश घवाळी, सोनल तारवे आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सन 2010 प्रमाणे आताच्या भरतीतही गैरप्रकार घडत असून गुण वाढवून देण्याबाबतचे संभाषणही सध्या राज्यभर व्हायरल झाले आहे. या रॅकेटची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना 70 टक्के प्राधान्य देण्यात यावे. अन्यथा आम्ही परजिल्ह्यातील उमेदवारांना रूजू करून घेणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकाला न्याय मिळाला की, जिल्हा बदल्यांचा प्रश्‍नच येणार नाही. 2010 पूर्वी जशी जिल्हास्तरावर भरती होत होती तशी भरती व्हावी, अशी आमची मागणी आहे. याविरोधातील लढा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात सुरू झाला आहे. संपूर्ण कोकणात या बोगस शिक्षकांना रूजू करून न घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहोत. यापूर्वी आम्ही रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोर्चेसद्धा काढले आहेत.

2010 साली रत्नागिरी जिल्ह्यात 1157 जागांसाठी शिक्षक भरती झाली. त्या भरतीत स्थानिक तरुणांना डावलण्यात आले. जिल्ह्यातील फक्‍त 37 उमेदवार नोकरीला लागले. उर्वरित उमेदवार विदर्भ, मराठवाड्यातील होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हीच स्थिती होती. जिल्हास्तरावर होणारी भरती 2010 नंतर राज्यस्तरावरून झाल्याने याचा सर्वात मोठा फटका कोकणातील तरुणांना बसला. तेच धोरण आता पुन्हा राबवले जात आहे. विदर्भ मराठवाड्यातील डीएड, बीएडधारकांचे पुनर्वसन कोकणात करून स्थानिकांना उद्ध्वस्त करू नका, ही मागणी केली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातले शिक्षक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात. आणि तीन वर्षानंतर पुन्हा ते आपापल्या जिल्ह्यात बदल्या करून रवाना होतात. त्यामुळे येथील शाळा शिक्षकांविना ओस पडतात. दरवर्षी 500 ते 600 शिक्षक जिल्हाबदली करून जात असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी स्थानिकांना भरतीत प्राधान्य मिळणे गरजेचे आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे दुर्गम व डोंगरी भागात वसले आहेत. डोंगरी भागाचे आरक्षण मिळावे. विदर्भ, मराठवाड्यातील बेरोजगारांचे कोकणात पुनर्वसन केल्यास येथील तरूण बेरोजगार होईल. यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, अशीही मागणी संघटनेने केली. 

बोगस भरतीविरोधात कोकणात लढा

शिक्षक भरतीत गुण वाढवून देणारे रॅकेट सध्या सक्रीय झाले असून यात बड्या अधिकार्‍यांसह, लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. या रॅकेटमध्ये विदर्भ, मराठवाड्यातील काही तरूण सहभागी आहेत. हे प्रकरण ठाण्याच्या कल्पेश ठाकरे याने उघडकीस आणले. अशा बोगस शिक्षकांना कोकणात थारा द्यायचा नाही, यासाठी आम्ही कोकणात एकवटलो आहोत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर याठिकाणी हा लढा उभारण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.