होमपेज › Konkan › शासकीय सेवेत १०० टक्के नोकर्‍या स्थानिकांना द्या

शासकीय सेवेत १०० टक्के नोकर्‍या स्थानिकांना द्या

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 8:45PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी

कोकणातील तरूणांकडे पुरेशी गुणवत्ता असूनही कोकणात 90 टक्के नोकरवर्ग आणि 100 टक्के अधिकारी उर्वरीत महाराष्ट्रातीलअसतो. यामध्ये अर्थकारण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे कोकणी तरूण देशोधडीला लागून पोटापाण्यासाठी कोकणाबाहेर जातो.आज कोकण विकासापासून वंचित आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र कोकण राज्याची मागणी करत आहोत. आज ना उद्या आम्ही ते निर्माण करणार आहोतच, पण तुर्तास कोकणातील शासकीय, निमशासकीय सेवेत 100 टक्के नोकर्‍या स्थानिकांना मिळायला हव्यात तसेच कोकणातील धरण प्रकल्प, बंदर आणि पर्यटन विकासाला चालना द्यावी, अशी मागणी स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रांताधिकारी कणकवली यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात प्रा. महेंद्र नाटेकर म्हणतात, संयुक्‍त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण सोडले तर त्यानंतरच्या सर्वच  मुख्यमंत्र्यांनी नोकर्‍या, शिक्षण, पाटबंधारे, पर्यटन, उद्योगधंदे इ. बाबत कोकणवर अन्यायच केला आहे. दुर्दैवाने स्थानिक  लोकप्रतिनिधी संसदेत व विधिमंडळात आवाज उठवत नाहीत.  आरक्षणाचा लाभही स्थानिकांना होत नाही. मराठ्यांना 16 टक्के आरक्षण मिळाले तरी त्याचा फायदा कोकणातल्यांना होणार नाही. राजकीय दबाव व भ्रष्टाचार यामुळेच हे सारे घडत आहे. गुणवत्ता असलेले स्थानिक उमेदवार मागे पडतात त्यामुळे कोकणातील मुलांवर अन्याय होत आहे.

नोकर्‍या नसल्याने तरूणांना स्थलांतर करावे लागते. परिणामी घरी आईवडील, आजी-आजोबा यांची वृध्दापकाळात दयनीय अवस्था होते.  या जीवघेण्या परिस्थितीतून कोकणी माणसांना वाचविण्यासाठी स्थानिकांनाच 100 टक्के नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत,अशी मागणी प्रा. नाटेकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रा. नाटेकर यांनी प्रांताधिकार्‍यांना दिले. यावेळी सुरेश पाटकर, एस. एस. पाटील, विश्‍वनाथ केरकर, कृष्णा दळवी, बी.आर. जामदार, डी. आर. माईणकर, एस.व्ही. राणे, एम. व्ही. म्हाळगी आदी उपस्थित होते.