होमपेज › Konkan › सावंतवाडीतील ‘माहेर केंद्रा’चा चेन्‍नईत गौरव

सावंतवाडीतील ‘माहेर केंद्रा’चा चेन्‍नईत गौरव

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 8:27PMकुडाळ : शहर वार्ताहर

महिला आर्थिक विकास महामंडळ,सिंधुदुर्ग अंतर्गत माहेर लोक संचलित साधन केंद्र, सावंतवाडी या संस्थेने ई-कॅटरिंग या भारतातील पहिल्या पथदर्शी उपक्रमात भरारी घेतली आहे. माहेरच्या या यशस्वी कार्याची दखल घेत हॅन्ड इन हॅन्ड अकॅडमी फॉर सोशल एंटरप्रेनरशिप,चेन्‍नई या संस्थेने तामिळनाडू राज्याचे सांस्कृतिक मंत्री ना. पांडियाराजन यांच्या हस्ते रोख 10 हजार रू. व सन्मानचिन्ह देऊन माहेर केंद्राचा विशेष गौरव केला. 

हा गौरव कार्यक्रम चेन्‍नई येथे रेन ट्री या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकताच पार पडला. माविम सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, माहेर लोक संचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा गीता परब, केंद्र व्यवस्थापक नमिता खेडेकर यांनी हा गौरव स्वीकारला. माविम मुख्यालय प्रतिनिधी कोकण विभाग सनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी मंगेश सूर्यवंशी, चेन्‍नई संस्थेचे सीईओ डॉ. एन. जेयासीलन व व्यवस्थापक उपस्थित होते.

ई-कॅटरिंग हा भारतातील पहिला पथदर्शी उपक्रम तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री ना. सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून साकार झाला. महिला बचत गट उत्पादित वस्तू उत्तम प्रतीच्या, उत्कृष्ट दर्जाच्या असतात. त्यांना बाजारपेठ मिळावी तसेच मालवणी जेवण आस्वाद रेल्वे प्रवाशांना घेता यावा याकरिता लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्गचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक योगेश प्रभू यांनी ही संधी माविम संचलित माहेर या संस्थेला मिळवून दिली.

या प्रकल्पाकरिता नाबार्डने 6 लाख 23 हजार रू.  रक्‍कम अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिले.दरम्यान या उक्रमासाठी देशभरातून उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले होते. देशभरातील 14 राज्यांमधून 44 अर्ज प्राप्त झाले होते. पैकी महिला आर्थिक विकास महामंडळ मुख्यालयाकडून महाराष्ट्रातील 5 उपक्रम पाठविण्यात आले होते. त्यातील दोन उपक्रम माहेर लोक संचलित साधन केंद्र, सावंतवाडी द्वारे काजू प्रक्रिया युनिट आणि ई-कॅटरिंग हे होते. त्यामधून सिंधुदुर्ग मधून ई-कॅटरिंग उपक्रमाची निवड करण्यात आली असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांनी दिली.