Sun, May 26, 2019 00:37होमपेज › Konkan › ...अखेर गॅस पाईपलाईन खोदकाम परवानगीचा प्रस्ताव तहकूब

...अखेर गॅस पाईपलाईन खोदकाम परवानगीचा प्रस्ताव तहकूब

Published On: Mar 05 2018 9:05PM | Last Updated: Mar 05 2018 9:04PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी शहरात घरगुती गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्याची परवानगी मागणार्‍या कंपनीने सुरक्षा उपाय योजनेसह इतर कोणत्याही माहितीचे सादरीकरण केले नाही. त्यामुळे हा विषय तहकूब ठेवण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले. त्यामुळे या विषयावर कोणतीही चर्चा न होता सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनीही खोदकाम परवानगी प्रस्तावाच्या तहकुबीला मान्यता दिली.

रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष तथा पीठासन अधिकारी राहुल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेसमोरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले. अवघ्या 15 मिनिटांमध्ये सभेसमोरील 11 विषय सर्वानुमते मंजूर झाले. यानंतर प्रभाग क्र.3 मधील आदिनाथ वाटिका इमारतीला देण्यात आलेल्या नळ कनेक्शनचा मुद्दा सेनेच्या राजेश्‍वरी शेट्ये यांनी उपस्थित केला. घरपट्टी थकीत असतानाही नळ जोडणी कशी देण्यात आली? असा प्रश्‍न उपस्थित केला. भाजपचे मुन्ना चवंडे, राजू तोडणकर, समीर तिवरेकर, अपक्ष नगरसेवक विकास पाटील यांनी अजून आर्थिक वर्ष संपले नसून घरपट्टी भरतील, असे सांगितले.

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी यावर घरपट्टी थकीत असेल तर दिलेली नळ जोडणी तोडली जाईल, असा निर्णय दिला. कर थकीत असेल तर नियमाने जोडणी देता येणार नाही, असे सेना गटनेते बंंड्या साळवी यांनी सांगितले. भाजप नगरसेवकांसह अपक्ष नगरसेवक पाटील यांनी ते 31 मार्चपूर्वी घरपट्टी भरतील, असे सांगितले. प्रभाग क्र.3 मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्याच प्रभागात ही इमारत असल्याने यावेळी मताचे राजकारण दिसून आले. 

उपनगराध्यक्षा स्मितल पावसकर यांनी शाळा विद्यार्थ्यांसाठी एरो मॉडलिंग शो आयोजित करण्याची केलेली मागणी सर्वसाधारण सभेत मंजूर केली. तसेच समाजकल्याण सभापती वैभवी खेडेकर यांनी मागासवर्गीय निधीतून विविध ठिकाणी पथदीप उभारण्याची केलेली मागणीही मंजूर झाली.

रत्नागिरी शहरात नॅचरल गॅस पुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्यासाठी मे.युनियन एनव्हार कंपनीने रनपला प्रस्ताव दिला. हा विषय सोमवारच्या सभेसमोर होता. कंपनीने केवळ प्रस्ताव दिला आहे. सुरक्षेसह इतर महत्वाच्या कामांचे सादरीकरण झाले नसल्याने हा विषय तहकूब ठेवत असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. सर्व नगरसेवकांनी ही सूचना मान्य केली.

शहराचा पर्यटन महोत्सव 29 एप्रिलपासून

रत्नागिरी शहराचा पर्यटन महोत्सव 29, 30 एप्रिल आणि 1 मे या कालावधीत होणार असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सर्वसाधारण सभा संपल्यानंतर सांगितले. या महोत्सवात येणार्‍या पर्यटकांना स्थानिक कला असलेल्या नमन, खेळे, जाखडी, दशावताराचा आस्वाद घेता येणार आहे. 1 मे रोजी नूतन मांडवी जेटीचे उद्घाटनही होणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.