Wed, Mar 27, 2019 04:23होमपेज › Konkan › देवरूखच्या कचर्‍याचे करायचे काय?

देवरूखच्या कचर्‍याचे करायचे काय?

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 8:55PMआरवली : वार्ताहर

देवरूख शहरातील कचरा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न कायम आहे. याचा फटका कांबळटेप परिसराला बसत आहे. शहरातील सर्व कचरा या डोंगरावर टाकला जात असून सद्यस्थितीत तेथे पाहणी करता कचराच कचरा चोहिकडे असे चित्र पहायला मिळाले. संबंधित जागा मालकांनी कचरा टाकू नका, असे सांगूनही तिथेच कचरा टाकत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

शहरात नियमित दीड टन कचरा तयार होतो. घंटागाड्यांद्वारे तो ओला आणि सुका अशा पध्दतीत गोळा करून पर्शरामवाडीसमोरच्या कांबळटेप डोंगरावर ओतला जातो. जिथे कचरा टाकला जातो तो परिसर खासगी मालकाचा आहे. या जागेपासून 150 मीटर अंतरावर नगरपंचायतीची मुख्य साठवण टाकी आणि जलशुध्दीकरण प्रकल्प आहे. मुळात पाण्याच्या टाकीपासून किमान 500 मीटरवर डम्पिंग ग्राऊंड नसावे, असा नियम असताना देवरूखात याला हरताळ फासण्यात आला आहे. 

ओतलेला कचरा भटकी गुरे पसरवत आहेत. त्यात भंगारवालेही भंगार गोळा करताना कचर्‍याची व्याप्ती वाढवत आहेत. डोंगरावर ओतलेला कचरा पेटवला जातो त्याच्या धुराचा त्रास आजुबाजूला होतो. ओतलेल्या कचर्‍यातील निम्मा कचरा सुका असल्याने तो वार्‍याने या परिसरात विखुरला गेला आहे. येथे दुर्गंधीचाही त्रास आहे.

पावसाळ्यात डोंगरावरील हाच कचरा खाली येणार आहे. तो खासगी मालकांच्या जमिनीत पडणार आहे. यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.डम्पिंग ग्राऊंडसाठी यापूर्वी एक जागा निश्‍चित झाली मात्र राजकीय हेतूने ती रद्द करून नवीन जागा शोधण्यात आली. तिचे मूल्यांकन कमी झाले. पहिली जागा शहराबाहेर होती. तीच योग्य होती. मात्र काहींचा अट्टाहास दुसर्‍या जागेसाठी असल्याने डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न निकाली निघालेला नाही. 

एकीकडे स्वच्छ भारत अभियानातून नगरपंचायत स्वच्छ देवरूख अभियान राबवत आहे. मात्र एका ठिकाणाहून उचललेला कचरा दुसर्‍या भागात नेऊन टाकणे याला स्वच्छता अभियान म्हणतात का? असा प्रश्‍न उपस्थित करीत नगरपंचायत आपल्याच भूमिकेला हरताळ फासत असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे.