सावंतवाडी : प्रतिनिधी
कोनशी मिनरल वॉटर प्रकल्प प्रश्नी 27 जून रोजी गावात ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन संबंधित प्रकल्प जागेची संपूर्ण तपासणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त पाण्याचा उपसा होणार असल्यामुळे गावच्या शेती बागायती तसेच ग्रामस्थांसाठी पाण्याचा मुबलक साठा कसा राहिल व प्रकल्पामुळे पाण्याचे मोठे नुकसान होऊ नये याकरिता भूगर्भतज्ज्ञांची टीम बोलावून भागाचे भूजल सर्व्हेक्षण केले जाणार असल्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.
कोनशी येथे कोनास बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सुमारे 5 कोटी रुपयांचा मिनरल वॉटर प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पातून दर दिवयी सुमारे 5 लाख लीटर पाणी उपसा केला जाणार आहेे. या प्रकल्पामुळे गावातील जलस्त्रोतांवर मोठा परिणाम होणार असल्याने प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच कोनशी-भालावल ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध सुरू केला आहे. यासंदर्भात 31 मे रोजी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोनशी - भालावल ग्रामस्थांनी प्रकल्पविरोधी उपोषण केले होते. त्यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी बुधवार 12 जून रोजी तहसील कार्यालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.
यानुसार बुधवारी सायंकाळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात कोनशी मिनरल वॉटर प्रकल्पप्रश्नी ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब, प्रकल्पाचे संचालक प्रशांत कामत, पर्यावरणप्रेमी संदीप सावंत, कोनशी हितवर्धक मंडळाचे साबाजी सावंत, लक्ष्मण सावंत, माजी सरपंच अर्जुन सावंत, शरद सावंत, रामचंद्र गवस, वैशाली गवस, समीक्षा सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
साबाजी सावंत यांनी कोनशी गावातील पाण्यावर ग्रामस्थांचा पहिला हक्क असल्याचे सांगितले. गावातील जमिनींमध्ये 15 ते 20 मीटर खाली भूगर्भात खडक असून भविष्यात या प्रकल्पामुळे पाण्याची पातळी खालावण्याचा धोका असल्यामुळे मिनरल वॉटर प्रकल्पाला लोकांचा तीव्र विरोध आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता या प्रकल्पाचे काम सुरु असून या विरोधात प्रशासनाकडे दाद मागूनही ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही. या प्रकल्पासाठी दररोज 5 लाख लीटर एवढा पाणी उपसा होणार असून त्याचा परिणाम गावच्या जलस्त्रोतांवर होणार आहे. कोनशी व भालावल गावची मिळून लोकसंख्या प्रत्येकी 600 आहे. या गावांना नैसर्गिक साधनसंपत्ती, फळबागायती व शेतीचे वरदान लाभले असून भविष्यात हा प्रकल्प झाल्यास ग्रामस्थांच्या शेती - बागायती व जनावरांसाठी पाणीच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे नुकसान होणार आहे. एप्रिल - मे महिन्यात गावात पाणीटंचाई जाणवत असून हा प्रकल्प झाल्यास पाण्याविना मोठ ्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल. प्रकल्पाला गावचा विरोध नाही मात्र ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून न घेता, त्यांना विश्वासात न घेता प्रकल्प उभारण्याची घाई सुरु आहे. नुकतेच या प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवातही झाली.याकडे त्यांनी तहसीलदारांचे लक्ष वेधले.
फक्त प्रकल्पाकडे जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर 2 कोटी 34 लाख रुपयांचा रस्ता केला जात आहे. या रस्त्यासाठी ग्रामस्थांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर जाऊन त्यांचे नुकसान होत आहे. या प्रकल्पासाठी काही प्रमाणात खाजगी तर वनजमिनी कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता ताब्यात घेतल्याचा दावा ग्रामस्थांनी यावेळी केला. ग्रामस्थांच्या बहुतांशी जमिनींवर बुलडोझर फिरवून सपाटीकरणही करण्यात आले आहे. शासनाचे आदेश, निर्देश, नियम धाब्यावर बसवून प्रकल्पाचे काम घाईघाईने करण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या पूर्ण जमिनीत 220 भागधारक असल्याची माहिती लक्ष्मण सावंत यांनी दिली. तर ग्रामस्थांनी संपूर्ण गावाला अंधारात ठेऊन काही गोष्टी प्रशासनाला हाताशी धरुन केल्या जात आहेत. खाजगी जमिनीत रस्ता करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? असा जाब ग्रामस्थांनी बैठकीत विचारला.
प्रकल्पाचे संचालक प्रशांत कामत यांनी हा प्रकल्प पूर्णतः पर्यावरणपूरक असल्याचे सांगत त्यामुळे गावचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे सांगितले. गावच्या जलस्त्रोतांवर परिणाम होऊ नये यासाठी पाणी जिरविण्यासाठी प्लांटेशन उभारण्यात येईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा प्रकल्प होऊ देणार नाही. त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प केला जावा असे सांगितले. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी कोनशी येथे उभारण्यात येणारा मिनरल वॉटर प्रकल्प चांगला प्रकल्प असून ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यात लक्ष घालावा. या प्रकल्पामुळे गावात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती तसेच गावच्या विकासाला हातभार लागणार असल्याकडे लक्ष वेधले.
या प्रकल्पामुळे गावातील पाण्याच्या जलस्त्रोतांवर काय परिणाम होईल? हे तपासण्यासाठी भूगर्भतज्ज्ञांची टीम बोलावून भूजल सर्व्हेक्षण केले जाईल. या अहवाला नंतरच प्रकल्पाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगत या संदर्भात प्रकल्पाची पाहणी करुन गावात येत्या 27 जून रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रकल्पप्रश्नी पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.