Sun, Jun 16, 2019 02:12होमपेज › Konkan › गांजा तस्करीचे कनेक्शन गोव्यापासून पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत!

गांजा तस्करीचे कनेक्शन गोव्यापासून पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत!

Published On: Jan 28 2018 11:59PM | Last Updated: Jan 28 2018 11:12PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

सोनुर्ली येथे संशयित लक्ष्मण बापू सावंत याच्याकडे सापडलेल्या गांजा सदृश्य पाकीटे व गोळ्याचे कनेक्शन हरमल- गोव्याशी असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. तर याचा पुरवठा कुडाळ तालुक्यातील झाराप, माणगाव भागातून थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यत पोहचल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्‍त होत आहे.

गेली अनेक वर्षे या तस्करीतून संशयितांने बरीच माया जमविली असून यातून मिळालेल्या पैशातुन त्यांने शेकडो  एकर जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे. त्याने ही जमीन नेमकी कुणाच्या नावे खरेदी केली आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही तस्करी तो थंड डोक्याने तो करत आहे. पोलीसांसमोर ताक तोंडही उघडत नसल्याने या प्रकरणाची पाळेमुळे खोदुन काढण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर  आहे.

संशयिताच्या या कारनाम्यांबाबत निनावी पत्राद्वारे गेली दोन वर्षे पोलिसात तक्रारी होत होत्या. पोलिसांनी एक- दोनदा त्याच्या घरावर धाडी ही घातल्या, परंतू यासंबंधी काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने त्याच्याविरुद्ध काही ही कारवाई झाली नाही.  सावंतवाडी पोलीस हवालदार संजय हुंबे यांनी त्याच्या घरावर घाड टाकली होती. तसेच जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही धाड टाकली होती. 
त्याने सापडलेला मुद्देमाल झाराप येथे नेत होतो असा जबाब दिला असला तरी तो नेमका कुणाला देण्यासाठी नेत होता, यामागील सूत्रधार कोण आहे, हा माल त्याला कोण पुरवतो याचा तपास केला जात आहे. शिवाय यात त्यांने कोणकोणत्या गाड्याचा वापर केला त्या गाड्यां ताब्यात घेऊन तपास केला जाणार आहे. या प्रकरणात त्याच्या पायलटचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले. 

गांजा प्रकरणाचा पर्दाफाश न झाल्यास पोलिस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा!

सावंतवाडी तालुक्यातील एका व्यक्‍तीकडे गांजा सदृश्य अंमली पदार्थ सापडला असुन या पदार्थांच्या पुरवठा करणार्‍या सूत्रधारांचा शोध  पोलीसांनी न घेतल्यास  सर्वपक्षीय ‘मोर्चा’ काढण्याचा  इशारा ‘स्वाभिमान’ चे तालुकाध्यक्ष  संजू परब यांनी दिला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघात गांजा प्रकरण उघडकीस येणे ही ‘लांच्छनास्पद’ गोष्ट असल्याची टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सावंतवाडी  सभापती रवींद्र मडगावकर, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर उपस्थित होते.
 

पोलिसांना गांजा प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढा अशी  मागणी पत्रकार परिषदेत संजू परब  केली. गांजा साठा पकडल्याबद्दल त्यांनी  बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर तसेच शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आनारोजीन लोबो व पोलिसांचे अभिनंदन केलेे.  गांजा प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याकडे  असून पोलीस निरीक्षक श्री. धनावडे निश्चितचं गांजा प्रकरणाचा छडा लावतील असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.

संशयित  सावंत यांच्या विरोधात  त्यांचे नातेवाईक मसुरकर यांनी दोन वर्षापूर्वी सावंतवाडी पोलीस व जिल्हा पोलिस  अधीक्षका कडे लेखी तक्रारी केल्या होत्या, परंतु त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यानेच  त्याचा धीर चेपला,असा आरोप श्री. परब यांनी केला. येत्या पंधरा दिवसात गांजा प्रकरणा पोलखोल न केल्यास  पोलिस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा  संजू परब यांनी दिला. लोबोंच्या आंदोलनाला स्वाभिमानचा पाठिंबा असुन सूत्रधाराला अटक न केल्यास सर्वपक्षीय आंदोलन छेडण्याचा इशारा परब यांनी दिला आहे.