होमपेज › Konkan › राजापुरात गंगेचे सहा महिन्यांनी पुनरागमन

राजापुरात गंगेचे सहा महिन्यांनी पुनरागमन

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:14PM

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

साक्षात विज्ञानाला आव्हान ठरत समस्त भाविकांच्या श्रद्धास्थानी असलेल्या राजापूरच्या गंगेचे बुधवारी सकाळी 6 वाजता आगमन झाले. या पूर्वी 7 मे  रोजी अवतीर्ण झालेली गंगा 19 जूनला अंतर्धान पावली होती. त्यानंतर केवळ सहा महिन्यांच्या कालखंडानंतर गंगेचे आगमन झाल्याने भाविकांसाठी ही पर्वणी ठरली आहे.  दरम्यान, गंगामाईच्या आगमनाची माहिती कर्णोपकणी पसरताच भाविकांनी गंगाक्षेत्राकडे धाव घेतली. अनेकांनी स्नानाचा लाभदेखील घेतला.

पावसाळा समाप्त झाला की साधारणपणे नोहेंबर-डिसेंबर महिन्यात पहाटेपासून सकाळपर्यंत उष्ण वारे वाहू लागले की गंगा आगमनाचे वेध लागतात व त्यानुसार गंगेचे आगमनदेखील झालेले आहे. तशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी सकाळच्या वेळी वाहणारे उष्ण वारे गंगा आगमनाची चाहूल देत असतानाच हा अंदाज यावेळीही बरोबर ठरला व बुधवारी सकाळी गंगेचे आगमन झाले. यापूर्वी दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन होत असे. त्यानंतर काही दिवसांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावत होती.

भूगर्भातील घडामोडींशी गंगेचा संबंध?

राजापूरच्या गंगेच्या सर्वदूर पसरलेल्या ख्यातीनुसार भूगर्भात भूकंप, त्सुनामीसारख्या घडामोडी घडल्यानंतर येथील गंगेचे आगमन झाल्याच्या घटनांची नोंद आहे. या पूर्वी दि. 26 जानेवारी 2001 मध्ये गुजरातच्या भूज, कांडला परिसरात भूकंपाचा मोठा तडाखा बसला होता. त्यावेळीही गंगेचे आगमन झाले होते. जेव्हा त्सुनामीचा तडाखा भारत, इंडोनेशियासह जगाला बसला होता. त्यावेळीही गंगा अचानक अवतीर्ण झाली होती. गेले काही दिवस ओखी वादळाचे सावट कोकण किनारपट्टीवरअसतानाच अचानक गंगेचे आगमन झाल्याने निसर्गासह भूगर्भातील घडामोडींशी गंगा आगमनाचा काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.