होमपेज › Konkan › आजपासून बाप्पांचा महाउत्सव

आजपासून बाप्पांचा महाउत्सव

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 12 2018 10:07PMकणकवली : प्रतिनिधी

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे गुरुवारी 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून, यादिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तींची स्थापना आणि पूजन केले जाणार आहे. या महाउत्सवाची घरोघरी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने मुंबईसह विविध भागातून चाकरमानी मंडळी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळपासूनच गणेश भक्‍तांनी मूर्ती वाजतगाजत आपल्या घरी नेण्यास सुरुवात केली. गुरुवारीही उर्वरित मूर्तींचे ढोल-ताशांच्या गजरात घरोघरी आगमन होणार आहे. अवघा सिंधुदुर्ग जिल्हा बाप्पांच्या या महाउत्सवासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारपासून पुढील अकरा ते एकवीस दिवस बाप्पांच्या भक्‍तिरसात सारेच न्हाऊन निघणार आहेत. 

यावर्षी तब्बल दहा दिवस बाप्पांचे आगमन उशिराने झाले आहे. त्यातच पावसाने आता थोडी विश्रांती घेतल्याने चाकरमान्यांसह गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. या महाउत्सवासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच गणेशभक्‍त गेले काही दिवस तयारीसाठी मेहनत घेत होते. आता तो दिवस येऊन ठेपला आहे. त्यातच दरवर्षीपेक्षा अधिक लाखोंच्या संख्येने चाकरमानी मंडळी गावागावांत, घराघरांत दाखल झाली आहेत. बाप्पांच्या या महाउत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. 

या उत्सवासाठी घरांची रंगरंगोटी झाली असून आकर्षक विद्युत रोषणाईने कोकणातील घरे झळाळून गेली आहेत. बाप्पांच्या आरासीतही कोणतीही कमी भक्‍तांनी ठेवलेली नाही. निसर्ग फुलांनी बाप्पांचा मंडप सजला आहे. 

बुधवारी बाप्पांच्या या स्वागताच्या तयारीवर अखेरचा हात 

फिरवण्यात आला. अनेक गणेशभक्‍तांनी बुधवारी सकाळपासूनच डोक्यावरून, डोलीतून आणि वाहनांनी गणेशमूर्ती वाजत गाजत घरी आणल्या. गुरूवारी सकाळीही बाप्पांना घरी आणण्याची लगबग असणार आहे. साधारणपणे दु. 12 ते 12.30 वाजेपर्यंत गणेशमूर्ती घरोघरी आणून विधीवत प्रतिष्ठापना आणि त्यांचे पूजन केले जाणार आहे. गुरूवारी पहाटे ब्राम्हमुहूर्तापासून ते दुपारी 1.30 वा. पर्यंत श्री गणेशमूर्तींची स्थापना करून पूजन करता येणार आहे असे पंचांगकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर सुरू होणार आहे तो बाप्पांच्या आरती आणि गोडधोड नैवेद्याचा प्रसाद. सायंकाळपासून पुन्हा आरती आणि रात्रौ भजने असा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी इंधन दरवाढीचा फटका बाप्पांच्या या उत्सवाला बसला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह भाज्या व इतर साहित्य महागले आहे. केरळमधील पूरस्थितीचा फटका नारळाला बसला, त्यामुळे नारळ काहीसे महागले आहेत. तरीही बाप्पांच्या या उत्सवात कोणतीही कमी न ठेवता गणेशभक्त या आनंदात मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत. 

बुधवारी भाद्रपद शुध्द तृतीयेला हरितालिका पूजन झाले. त्यानिमित्ताने सुहासिनींनी भगवान शंकर आणि पार्वतीमातेचे पूजन केले. गुरूवारपासून सुरू होणार्‍या बाप्पांच्या महाउत्सवासाठी आता सारेच सज्ज झाले आहेत.