होमपेज › Konkan › चिरेखाणीतील मातीपासून साकारताहेत गणेशमूर्ती

चिरेखाणीतील मातीपासून साकारताहेत गणेशमूर्ती

Published On: Jul 23 2018 11:13PM | Last Updated: Jul 23 2018 10:52PMगिमवी : वार्ताहर

अलीकडे प्‍लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती गणेशोत्सवात घरोघरी आणल्या जातात. हलक्या व आकर्षक दिसणार्‍या या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. शाडूच्या मातीच्या मूर्ती आता कालबाह्य होत आहेत. तसे मूर्तिकारदेखील शोधून सापडत नाहीत. शिवाय शाडूची माती परवडतदेखील नाही. त्याला पर्याय म्हणून गुहागर तालुक्यातील पालपेणे येथील मूर्तिकार संजय दाभोळकर यांनी चक्‍क चिरेखाणीतून मिळणार्‍या लाल मातीतून गणेशमूर्ती घडवल्या आहेत. 

मूळचे दाभोळचे रहिवासी असणारे संजय दाभोळकर पालपेणे येथे वास्तव्य करून राहिले. आपल्या इतर व्यवसायांबरोबरच त्यांनी गणेशमूर्ती कार्यशाळा सुरू केली. त्यांच्या सुबक हस्तकलेला जनतेमधूनही तितकाच उत्‍तम प्रतिसाद मिळू लागला. पूर्वी ते शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवत होते. मात्र, कालांतराने त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाच्या द‍ृष्टीने पाऊल उचलून तालुक्यातील चिरेखाणीमधील माती आणून त्यातून सुबक गणेशमूर्ती घडविण्याचे काम सुरू केले. या सुबक आणि आकर्षक गणेश मूर्ती तालुक्यात आणि तालुक्याबाहेरही अत्यंत प्रसिद्धीस आल्या. त्यामुळे चिरेखाणीतील मातीच्या मूर्तींना मागणीदेखील वाढली. 

याबाबत ते म्हणाले की, आपण सातशेहून अधिक अशा मूर्ती तयार करतो. चिरेखाणीतून चिर्‍याची माती आणून त्यापासून मूर्ती घडवत आहे. या मातीच्या मूर्ती अल्पावधीत  विसर्जित होतात आणि या मातीच्या मूर्तींवर आखणी रेखीव होते. शिवाय या मातीवर मूर्तिकाम करताना समाधान वाटते, असे सांगितले. 

चिरेखाणीमधील माती फुकटच जाते. त्याच मातीचा उपयोग गणेश मूर्ती घडविण्यासाठी केल्यामुळे मूर्तींच्या मागणीत वाढ होत आहे. तालुक्यातील इतर गणेश मूर्तिकारांनीही याचेच अनुकरण केल्यास पर्यावरण संरक्षणास हातभार लागू शकतो, असे दाभोळकरांचे म्हणणे आहे. त्यांच्या या कामात त्यांच्या मुलांचाही हातभार लागतो. शाळेतून आल्यानंतर या मुलांना मूर्तीवर रंगकाम करावयास आवडते. गेल्या तीन वर्षांपासून रंगकाम करणे व मूर्ती बनविणे यामध्ये त्यांनीही झोकून दिले आहे व याची आवडही निर्माण झाली आहे.  या मूर्ती अनेकजण मुंबई, पुणे येथेही घेऊन जात असतात.