Sun, Jul 21, 2019 02:04होमपेज › Konkan › गणेशोत्सवात परतीच्या ६२५ गाड्या फुल्‍ल

गणेशोत्सवात परतीच्या ६२५ गाड्या फुल्‍ल

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 9:27PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

गणेशोत्सवात कोकणात पुणे, मुंबईसह राज्यभरातून 2 हजार 225 गाड्यांमधून गणेशभक्‍त येणार असून, जिल्ह्यात येणार्‍या गणेशभक्‍तांच्या परतीच्या प्रवासासाठी 1 हजार 500 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामधील 625 गाड्यांचे आरक्षण फुल्‍ल झाले असून, गतवर्षीप्रमाणे या वर्षीही ग्रुप बुकिंगला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी 40 गाड्यांचे ग्रुप बुकिंग करण्यात आले आहे.

नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, पुणेसारख्या शहरांत राहणारे कोकणवासीय गणेशोत्सवात गावी परततात. गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणार्‍या गणेशभक्‍तांच्या सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. या भक्‍तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळामार्फत दरवर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. यावर्षी पुणे, मुंबईसह 2 हजार 225 गाड्यांमधून गणेशभक्‍त आपल्या गावी येणार आहेत. दि.8 सप्टेंबर पासून गाड्या रत्नागिरीत दाखल होणार आहेत. गतवर्षी 1414 गाड्या परतीसाठी सोडण्यात आल्या होत्या. यावर्षी परतीच्या प्रवाशांसाठी 1 हजार 500 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामधील 625 गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. 

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि गणेशोत्सवात येणार्‍या प्रवाशांचा एसटी गाड्यांमध्ये बिघाड झाल्यास खोळंबा होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पथके तैनात करण्यात येणार आहेत. कशेडी, चिपळूण येथे तपासणी नाका, संगमेश्‍वर येथे दुरुस्ती पथक, चिपळूणमध्ये क्रेन ठेवण्यात येणार आहे. चिपळूण ते राजापूर मार्गावर गस्ती पथकाची नियुक्‍ती करण्यात येणार असून, यामध्ये दुरुस्ती पथकाचाही समावेश आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रात्रीच्या दोन ड्युटीमध्ये गस्ती पथक सर्व मार्गांवर फिरणार आहे. नवीन चालकांना आवश्यक असलेल्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आगाराला पालक अधिकारी नियुक्‍त करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.