होमपेज › Konkan › गणपती इलो रे इलो, विमानान इलो!

गणपती इलो रे इलो, विमानान इलो!

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 12 2018 10:11PMचिपी : गणेश जेठे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगावी, घराघरांत गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली असतानाच चेन्‍नई विमानतळावरून निघालेला आयआरबी कंपनीचा गणपती बुधवारी सकाळी बरोबर 11.50 मिनिटाच्या मुहूर्तावर खास विमानाने चिपी माळरानावरील सिंधुदुर्ग विमानतळावर उतरला आणि गेले कित्येक महिने चर्चेत असलेले सिंधुदुर्ग विमानतळावरील पहिले लँडिंग अखेर निर्विघ्नपणे पार पडले. 

चेन्नईकडून आलेले विमान जेव्हा विमानतळावर जमलेल्या शेकडो सिंधुदुर्गवासीयांच्या नजरेच्या टप्प्यात आले तेव्हा जमलेल्या अबालवृद्धांनी आकाशाकडे हात करून एकच जल्लोष केला. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर विमानतळावर उतरणारे समृद्धीचे विमान पाहताच आनंद ओसंडून वाहू लागला होता. या विमानाने जेव्हा सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाला भक्‍तिभावाने खाली उतरवले तेव्हा विमानतळावर जमलेल्या लोकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा एकच गजर सुरू केला. हा आनंदाचा सोहळा जमलेल्या प्रत्येकाने ‘याची देही याची डोळा पाहत’ तो आयुष्यभरासाठी साठवून ठेवला.

विमानतळ पाहणे, विमानाचे जवळून दर्शन घेणे आणि त्याच विमानातून प्रवासाची स्वप्ने पाहणे हा सर्वांसाठी कुतूहलाचा विषय होता. महाराष्ट्रातील मुंबई विमानतळानंतर सर्वांत मोठे दुसरे विमानतळ चिपीच्या माळरानावरील असून हे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे, अशी घोषणा जेव्हा करण्यात आली तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. 

पालकमंत्र्यांनी जनतेला या विमानाच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन केले होते. या विमानतळावरील लँडिंगच्या सातत्याने होणार्‍या घोषणा, राजकीय आरोप-प्रत्यारोप, परवानग्या मिळण्यासाठी झालेली घाईगडबड यामुळे या विमानाच्या लँडिंगचे कुतूहल वाढले होते. त्यातही दस्तुरखुद्द गणपती बाप्पाच या विमानाने येणार म्हटल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने सकाळपासून गर्दी करू लागले होते. त्यात महिला आणि लहान मुलांचा मोठा सहभाग होता. शाळांना सुट्टी असल्यामुळे शाळकरी मुलेही पहिले विमान पाहण्यासाठी उत्सुक होते. विमानतळाची सुरक्षा वाढविण्यात आली होती. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, आयआरबीचे सर्व अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, माजी आ. राजन तेली, माजी आ. पुष्पसेन सावंत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी विमान पोहोचण्यापूर्वीच विमानतळावर स्वागतासाठी पोहोचले होते. 

मंगळवारी सायंकाळपर्यंत हे विमान मुंबईतून टेकऑफ घेऊन सिंधुदुर्गात येणार असल्याची बातमी होती. परंत सकाळी हे विमान चेन्नईतून निघणार असल्याची माहिती देण्यात आली. स.10 वाजून 30 मिनिटांनी चेन्नई विमानतळावरून गणपती बाप्पाला घेऊन विमानाचा कॅप्टन आणि दोन को-पायलट निघाल्याची बातमी देण्यात आली. सव्वा तासात विमान पोहोचेल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला. 

जमलेल्या शेकडो लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. प्रत्येकाच्या नजरा आकाशात होत्या. एवढ्यात 11.30 वा. विमान आकाशात दिसले. वृत्तापत्रांमध्ये या विमानाची छायाचित्रे अगोदरच प्रसिध्द झाल्याने त्या विमानाला ओळखण्यास वेळ लागला नाही. विमान दृष्टीस पडताच जमलेल्या लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. ढोलताशांचा गजर सुरू झाला. मध्येच शिवसैनिक घोषणा देवू लागले होते, झेंडाही फडकवू लागले होते. विमान उतरण्यापूर्वी विमानतळाच्या परिसराला 15 कि.मी.ची फेरी विमानाने मारली आणि अडीच कि.मी. लांबीच्या दणकट धावपट्टीवर विमान अलगदपणे उतरले. बरोबर 11.50 मिनिटांनी टर्मिनल इमारतीच्या समोरील प्रांगणात विमान येवून स्थिरावले.

पहिल्या वहिल्या लॅण्ड झालेल्या विमानाची शूटिंग आणि फोटो घेण्यामध्ये प्रत्येकाचे मोबाईल पुढे सरसावले होते. विमान स्थिरावले आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाची उत्कंठा ताणली. आरबीआयचे अधिकारी गणपतीचा सजवलेला पाट घेवून विमानापर्यंत पोहोचले. थोड्याच वेळात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही विमानात पोहोचले. गणेशाची मूर्ती सुरक्षितपणे पॅक करून ठेवण्यात आली होती. ती खाली उतरविण्यात आली आणि पॅकिंग काढून भक्‍तिभावाने पाटावर बसविण्यात आली. गणपतीबाप्पाला घेवून अधिकारी तसेच विमानातील पायलट, को-पायलट टर्मिनलच्या दिशेने जेव्हा सरसावले तेव्हा गणपती बाप्पा मोरयाचा गजर पुन्हा एकदा सुरू झाला. टर्मिनलमध्ये गणपतीसाठी आरास करण्यात आली होती. गजर करत गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पालकमंत्री, खासदार आणि अधिकार्‍यांनी गणपतीची पूजा केली. 

टर्मिनल इमारतीच्या बाजूलाच आनंद सोहळा साजरा करण्यात आला. जेव्हा आलेल्या पहिल्या विमानातील कॅप्टन व पायलटचा सत्कार करण्यात आला तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. कारण तीन पायलटपैकी एक असणारी को-पायलट देवगड तालुक्यातील मोंड गावातील पूनम मोंडकर ही होती. जेव्हा तिचा सत्कार करण्यात आला तेव्हा ती भारावून गेलेली दिसली. पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, राजन तेली यांची भाषणे यावेळी झाली. जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनीही मनोगत व्यक्‍त केले. आयआरबीच्या अधिकार्‍यांनीही आपले यश लोकांसोबत शेअर केले. हा कार्यक्रम आटोपायला दीड तास लागला. त्यानंतर आलेल्या विमानाने पहिले टेकऑफ घेतले. लँण्डिंगसाठी आसुसलेल्या शेकडो लोकांनी टेकऑफचा आनंद घेण्यासाठी खूप वेळ वाट पाहिली. अखेर चेन्नईवरून आलेले विमान सिंधुदुर्ग विमानतळावरून टेकऑफ घेत मुंबईच्या दिशेने झेपावले. सिंधुदुर्गवासीयांसाठी हा एक आनंद सोहळा होता.

12 डिसेंबरपासून दररोज विमान : ना. केसरकर

आणखी दोन महिन्यांनी 12 डिसेंबर रोजी माल्टा देशाचे विमान याच विमानतळावर उतरणार आहे. माल्टा देशातील व्हीआयपी पर्यटक म्हणून सिंधुदुर्गात पाहुणचार घ्यायला येणार आहेत आणि तेथूनच दररोज ही विमान वाहतूक सेवा सुरू राहणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.