Sun, Aug 18, 2019 20:37होमपेज › Konkan › गणपतीपुळ्याच्या ‘श्रीं’च्या आरतीत सहभागी व्हा घरबसल्या!

गणपतीपुळ्याच्या ‘श्रीं’च्या आरतीत सहभागी व्हा घरबसल्या!

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 8:19PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पर्यटकांचा राबता असलेले व लाखो  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळेच्या बाप्पाचे दर्शन आता घरबसल्या उपलब्ध होणार आहे. ही सुविधा ऑनलाईन करताना मंदिरात दोनवेळा होणार्‍या आरत्या देवस्थान समितीकडून अ‍ॅॅपच्या माध्यमातून निशुल्क स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. यासाठी गणपतीपुळेच्या देवस्थान समितीकडून विशेष अ‍ॅॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

अ‍ॅप अपडेट करून त्यामध्ये श्रींच्या दुपारी आणि सायंकाळी होणार्‍या आरतींचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध  करून देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यादृष्टीने अ‍ॅॅपमध्ये बदल करणे व त्याच्या चाचण्या घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. 

गणपतीपुळे तिर्थक्षेत्र केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात प्रसिध्द आहे. दररोज श्रींच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होतात. अंगारकी चतुर्थी व अन्य महत्त्वाच्या दिवशी भक्तांची संख्या तर लाखात असते. धार्मिक महत्त्वाबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांचा ओढा गणपतीपुळेकडे वाढत आहे.जागतिक स्तरावर पर्यटनाच्यादृष्टीने  नंबर एकचे असलेले गणपतीपुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटशी जोडल्याने ऑनलाईन झाले आहे.त्यामध्ये आता ‘बाप्पा’चे दर्शनही घरबसल्या होऊ लागले आहे.

काही देवतांचे दर्शन वाहिन्यांच्या माध्यमातून तर काहींचे दर्शन लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही उपलब्ध आहे. आता यामध्ये गणपतीपुळे येथील श्रींचाही समावेश होणार आहे. त्यामुळे भाविकांना आरतीत घरबसल्या सहभागी होता येईल.