Fri, Aug 23, 2019 21:17होमपेज › Konkan › सिंधुदुर्गच्या मूकबधिर कन्येने मिळविली जीडी आर्ट पदवी

सिंधुदुर्गच्या मूकबधिर कन्येने मिळविली जीडी आर्ट पदवी

Published On: Sep 13 2018 1:45AM | Last Updated: Sep 12 2018 10:01PMशिरोडा : वार्ताहर

जिल्ह्यातील मुकबधीर विद्यार्थीनी सुचिता कारूडेकर हिने जी. डी. आर्ट पदवी धारण केल्याबद्दल अपंग विकास महासंघातर्फे तिचा सत्कार करून तिच्या व्यावसायिक पूनर्वसनांची जबाबदारी अपंग महासंघाने स्वीकारली आहे.  सुचिता ही अशा प्रकारची पदवी प्राप्त करणारी जिल्ह्यातील पहिली मूकबधिर विद्यार्थीनी आहे.

सुचिता सचिन कारूडेकर  ही मळेवाड  गावची सुकन्या आहे. तिचा या यशा बद्दल राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने तिचा जाहीर सत्कार केला. चित्रकार प्रकाश कबरे, महासंघाचे बाळा बोर्डेकर, संदीप पाटकर, राज्य सचिव व जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. 

अपंग विकास महासंघातर्फेजिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अपंगांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून  सुचिता कारूडेकर हिला चित्रकला विषयातील उच्च शिक्षण  सांगली  येथील  महाविद्यालयात घेण्यासाठी  महासंघाच्यावतीने आर्थिक खर्च करण्यात आला होता. तसेच ना. दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने तिला पाच वर्षासाठी वसतीगृह प्रवेश मिळाला होता. तिला बोलायला व ऐकायला येत नाही. तरीही तिने सर्वसाधारण मुलांमधून ही पदवी संपादीत केली. या यशाचे कौतूक म्हणून जिल्ह्यातील अपंग बांधवांनी तिच्या घरी जात तिचा सत्कार केला. सुचिताने काढलेली चित्रे राज्यात विविध ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडणार व तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी महासंघ घेईल असे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.  दत्तात्रय पाटील (गोवा), बापू गिरप (रोटरी क्‍लब अध्यक्ष, गोरेगाव), संदीप पाटील (उद्योजक), सचिन आकलेकर (चित्रकार), चौधरी बुक स्टॉल (बेळगाव) यांनी चित्र प्रदर्शनासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.  प्रसिध्द चित्रकार प्रकाश कबरे व बाळा बोर्डेकर यांनी सूचिताला आर्थिक मदत देऊन सर्वप्रकारचे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.