होमपेज › Konkan › चिपळूण-कराड रेल्वेचे भवितव्य टांगणीला

चिपळूण-कराड रेल्वेचे भवितव्य टांगणीला

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 06 2018 10:32PMचिपळूण : खास प्रतिनिधी

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होणार, या घोषणेनंतर चिपळूण-कराड रेल्वेचे भवितव्य टांगणीला लागल्याची चर्चा आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतीच वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेबाबत घोषणा केली. यामुळे चिपळूण-कराड रेल्वेमार्ग अडचणीत सापडला असून, राज्य आणि केंद्र स्तरावर आधी मंजुरी मिळूनदेखील हा प्रकल्प अनिश्‍चिततेच्या भोवर्‍यात अडकला आहे.

युपीए सरकारच्या काळात केंद्र आणि राज्य स्तरावर चिपळूण-कराड रेल्वेला हिरवा सिग्‍नल मिळाला. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 50-50 टक्के निधीतून हा प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित झाले. त्यानुसार तत्कालीन आघाडी शासनाने चिपळूण-कराड मार्गासाठी अर्थसंकल्पात 1200 कोटींची तरतूद केली. रेल्वे मंत्रालयानेदेखील हा प्रस्ताव मंजूर केला. यानंतर चिपळूण-कराड रेल्वेसाठी प्रकल्प अहवाल तयार झाला. 

चिपळूण, कोयना, पाटण ते कराड असा मार्ग ठरला. सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर झाला. इतकेच नाही तर या प्रकल्पाच्या कामासाठी शापुरजी, पालोजी या कंपनीला काम देण्यात आले. मात्र, शासनाने हे काम देताना केंद्र व राज्य स्तरावर करार केला. सुरुवातीला बीओटी तत्त्वावर हे काम देण्यात आले. केंद्रातील भाजप आणि राज्यातील युती शासनाच्या काळात या कामाच्या कराराचा मोठा सोहळा करून श्रेयदेखील घेण्यात आले. हा कार्यक्रम तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. 

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्याचे चिपळूण, कराड आणि मुंबई येथे प्रक्षेपणदेखील झाले. त्यामुळे या मार्गाचे तातडीने काम सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, हा मार्ग मार्गी लागत असतानाच अचानक दुसरा प्रस्ताव असलेला वैभववाडी-कोल्हापूरचा प्रस्ताव पुढे आला.

दरम्यानच्या काळात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे खांदेपालट होऊन त्यांच्याजागी ना. पियुष गोयल यांची वर्णी लागली. यानंतर चिपळूण-कराड परिसरातून प्रकल्प रद्द झाला म्हणून चर्चा सुरू झाली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे शौकत मुकादम, आ. भास्कर जाधव यांनी या विरोधात आवाज उठवला. यात नंतर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते व खा. विनायक राऊत यांनी या प्रकल्पाबाबत केंद्रस्तरावर दबाव टाकला. यानंतर हा प्रकल्प पूर्ण करणारच, असे जाहीर करण्यात आले. शिवाय याचवर्षी झालेल्या केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चिपळूण-कराड रेल्वेसाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी सध्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचे काम तातडीने सुरू करणार, असे ना. प्रभू यांनी घोषित केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

वैभववाडी-कोल्हापूरसाठी अवघी 10 लाखांची तरतूद
केंद्रीय मंत्री प्रभू यांनी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करणार अशी घोषणा केली असली तरी या मार्गासाठी यावर्षी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अवघ्या 10 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा राज्य शासनाचा 50 टक्के सहभाग यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केलेली नाही. याउलट चिपळूण-कराड रेल्वेसाठी राज्य शासनाने बाराशे कोटी रुपये तर केंद्र शासनाने यावर्षी बजेटमध्ये तीनशे कोटींची तरतूद केली आहे. तरीही ना. प्रभू यांच्या घोषणेमुळे चिपळूण-कराड रेल्वे मार्गाबाबत शंकेची पाल चुकचुकत आहे.