Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Konkan › ‘हत्ती’एवढे नुकसान,‘चिलटा’एवढी भरपाई!

‘हत्ती’एवढे नुकसान,‘चिलटा’एवढी भरपाई!

Published On: Apr 06 2018 11:38PM | Last Updated: Apr 06 2018 10:50PM सावंतवाडी : सुनील कदम

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कर्नाटकातून आलेल्या जंगली हत्तींनी जर शेतकर्‍यांच्या मालमत्तेचे नुकसान केले तर संबंधितांना पाच ते दहा हजार रूपयांची मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, हत्तींमुळे होत असलेल्या विध्वंसाचे प्रमाण विचारात घेता ही मदत म्हणजे ‘हत्तीएवढे नुकसान आणि चिलटाएवढी भरपाई’ असे म्हणावे लागेल. कारण आजपर्यंत यामुळे झालेले नुकसान अपरिमित स्वरूपाचे आहे आणि भविष्यातही ते होत राहण्याचा धोका कायम आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, भुदरगड व आजरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ व आंबोली तालुक्यांमध्ये साधारणत: 2002 सालापासून कर्नाटकातून आलेल्या जंगली हत्तींचा उपद्रव सुरू झालेला आहे. सुरूवातीच्या काळात पंचवीस हत्तींच्या कळपाने जवळपास दोन वर्षे या भागात चांगलाच धुमाकूळ घातला होता. कर्नाटक सरकारच्या मदतीने आणि राज्य वनखात्याच्या प्रयत्नाने यातील जवळपास 16 हत्ती परत पाठविण्यात यश आलेले आहे, मात्र अजूनही जवळपास सात हत्ती या भागात तळ ठोकून आहेत. चंदगडपासून दोडामार्ग पर्यंतच्या जंगलाला या हत्तींनी आता आपला कायमस्वरूपी अधिवास बनविल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे या भागात या जंगली हत्तींचा वावर सातत्त्याने दिसून येतो. त्यामुळे आता हे हत्ती या भागातून हलणार नाहीत यावर जवळ जवळ शिक्कामोर्तब झाल्यात जमा आहे.

या जंगली हत्तींचा आणि या परिसरातील शेतकर्‍यांचा संघर्षही जुनाच आहे. हत्तींचा हा कळप एखाद्या शेतात शिरला की रातोरात शेती भुईसपाट व्हायला वेळ लागत नाही. याच कारणावरून गेल्या काही वर्षांपासून या भागात हत्ती विरूध्द शेतकरी असा एक नवाच संघर्ष उभा राहिल्याचे दिसून येते. या संघर्षात आतापर्यंत जवळपास 20 लोकांचा बळी गेला आहे आणि या काळात राबविल्या गेलेल्या हत्ती हटाव मोहिमेच्या दरम्यान दोन हत्तींचाही जीव गेलेला आहे. या काळात हत्तींनी केलेल्या शेतीचे आणि अन्य प्रकारचे नुकसान हे काही कोटीत मोजावे लागेल, एवढे प्रचंड आहे. त्या त्या वेळी संबंधित शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून शेतीच्या नुकसानीच्या काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळत आलेली आहे, मात्र झालेले नुकसान आणि मिळणारी भरपाई यांचे प्रमाण नेहमीच उणे स्वरूपाचे असल्याचे बघायला मिळते.

यापूर्वी हत्तींकडून झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळत होती. आता शासनाने हत्तींकडून जर कृषि अवजारे आणि कुंपण अथवा संरक्षक भिंतींचे नुकसान झाले तर अनुक्रमे पाच आणि दहा हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आजकाल एवढ्या कमी किमतीत कोणती कृषि अवजारे मिळतात आणि दहा हजार रूपयांमध्ये संरक्षक भिंतीच्या किती विटा रचल्या जातील, याचा शासनानेच विचार करण्याची आवश्यकता आहे. हत्तींकडून होणार्‍या अवाढव्य स्वरूपाच्या नुकसानीपोटी शासनाने मंजूर केलेली ही भरपाई म्हणजे संबंधितांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार ठरणार आहे. त्यामुळे  शासनाने या रकमेत भरीव वाढ करण्याची आवश्यकता आहे.

Tags : Funds, Sufficient For Loss, Farmers, Kokan, Kolhapur  Animals Destroyed Firm