Wed, Apr 24, 2019 12:00होमपेज › Konkan › बांबोळी रुग्णालयात आरोग्यदायी योजनेला तत्त्वतः मान्यता

बांबोळी रुग्णालयात आरोग्यदायी योजनेला तत्त्वतः मान्यता

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 10:38PMसावंतवाडी :  प्रतिनिधी

गोवा- बांबोळी रुग्णालयात महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले आरोग्यदायी योजना राबविण्यास  राज्य शासनाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. यासाठी केवळ इन्शुरन्स कंपनीच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. या योजनेचा थेट फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ना. केसरकर  बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय तसेच मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. हा निर्णय राज्य मंत्रिमंडळ स्तरावर लवकरच जाहीर केला जाणार आहे. जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेजचा आपला आग्रह असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यात सद्यस्थितीत असलेल्या शासकीय रुग्णालयांचा दर्जा वाढला पाहिजे. वेंगुर्लेसारख्या 30 बेडच्या रुग्णालयामध्ये बदल होऊन ते 100 बेडचे व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करत  आहे. जिल्ह्यात स्पेशालिस्ट डॉक्टर येत नाहीत किंवा रिक्‍त पदांवर डॉक्टर रुजू होत नाहीत, यासाठी जिल्ह्यातच थेट डॉक्टर भरती करण्याबरोबरच स्पेशल डॉक्टरांसाठी विशेष सवलती, भरती होणार्‍या डॉक्टरांकरिता वेतनवाढीचाही निर्णय शासनाने घेतला आहे. रुग्णालयांना आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी जिल्हा नियोजनमधून निधी दिली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  

सद्यस्थितीमध्ये इमर्जन्सी रुग्णाला गोवा मेडिकलमध्ये कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अन्य रुग्णांना ज्योतिबा फुले योजनेंतर्गत शुल्क आकारणीत रिअ‍ॅम्बॅसमेंट देता येऊ शकेल काय याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.