Wed, Apr 24, 2019 11:40होमपेज › Konkan › नववर्ष ठरो विकास प्रकल्पांसाठी फलदायी!

नववर्ष ठरो विकास प्रकल्पांसाठी फलदायी!

Published On: Jan 01 2018 1:59AM | Last Updated: Dec 31 2017 9:26PM

बुकमार्क करा
सिंधुदुर्ग : अजित सावंत

नोटबंदीच्या धक्क्यातून सावरत असतानाच लागू झालेले जीएसटी धोरण, परिणामी सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण, त्यातच वाढलेली महागाई, दैनंदिन व्यवहारांवर झालेला परिणाम आणि सुखदुःखाच्या घटना अशा अनेक घडामोडींचे साक्षीदार ठरलेल्या ‘2017’ या गतवर्षाला निरोप देत सिंधुदुर्गवासीयांसह मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झालेल्या देशी-विदेशी पर्यटकांनी ‘2018’या नव्या वर्षाचे सागरी किनारपट्टीपासून सह्याद्रीपर्यंत रविवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार स्वागत व सेलिब्रेशनही  केले. पर्यटकांच्या वर्दळीमुळे सिंधुदुर्गातील सर्वच सागरी किनारे आणि हिलस्टेशन गजबजून गेले होते. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृध्द असलेल्या कोकणात येत्या काळात कोकणच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे अनेक विकास प्रकल्प होऊ घातले आहेत. त्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, चिपी विमानतळ,  सी वर्ल्ड. ग्रीन रिफायनरी, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, कोल्हापूर-वैभववाडी नवा रेल्वेमार्ग , सोनवडे घाट, देवगड- आनंदवाडी प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. यातील चिपी विमानतळाचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे तर उर्वरित प्रकल्पांना नुकतीच सुरुवात होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पांसाठी ‘2018’ हे नवे वर्ष तरी फलदायी ठरेल, अशी आशा आहे. अर्थात येथील जनता आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍नही तितकेच महत्त्वाचे आहेत. केंद्र आणि राज्य शासनानेही निश्‍चितपणे याचा गांभिर्याने विचार करायला हवा आणि विकासासाठी जनतेचीही सकारात्मक भूमिका आवश्यक आहे.