Wed, Jan 16, 2019 15:33होमपेज › Konkan › सिंधुदुर्गनगरीत डाकअधीक्षक कार्यालयावर सेवकांचा मोर्चा

सिंधुदुर्गनगरीत डाकअधीक्षक कार्यालयावर सेवकांचा मोर्चा

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 10:04PMओरोस : प्रतिनिधी

ग्रामीण डाक सेवा कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचारी दर्जा द्या, कमलेशचंद कमिटीच्या सातवा वेतन आयोग अहवालात सुचविलेल्या दुरुस्ती त्वरित लागू करा, यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेने सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा डाकघर अधीक्षक कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. 

अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेने जिल्हाध्यक्ष अभिमन्यू धुरी, सचिव जय मोडक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामीण डाकसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ग्रामीण कर्मचार्‍यांच्या हिताच्या दृष्टीने वारंवार झगडत व संप पुकारून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी प्रतिनिधी म्हणून बरेच संप धारणा कार्यक्रम राबविले. त्यात सकारात्मक आश्‍वासने दिली पण त्याच्या पूर्ततची अद्यापर्यंत अंमलबजावणी केलेली नाही. आपल्या ग्रामीण कर्मचार्‍यांच्या हिताच्या मागण्या शासनाकडे दिलेल्या, परंतु त्याची दखल न घेतल्याने न्याय मागण्यांसाठी सिंधुदुर्गनगरी येथील अधीक्षक डाकघर कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चातून ग्रामीण डाक सेवा कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा, कमलेशचंद कमिटीने दिलेल्या सातवा वेतन आयोग अहवाल युनियनने सुचविलेल्या दुरूस्तीसह त्वरित लागू करा, ग्रामीण डाक कर्मचार्‍यास 8 तासाचे काम देऊन सेवेत कायम करून घ्यावे, कॅज्युअल लेबल पार्टटाईम कर्मचारी तसेच एम. एम. एस वर्कर यांच्या अलाउन्सची 1 जानेवारी 2006 पासून रिविजन करा व अरीअर्स पेड करा, मागील चार वर्षापासून थांबविलेला महागाई भत्ता आदा करा यासह विविध मागण्यांबाबत लक्ष वेधले. शिष्टमंडळाने अधीक्षकांशी चर्चा करून न्याय प्रश्‍न शासन दरबारी सादर करण्याचे सूचित केले. त्यानुसार अधीक्षक यांनी शासनाला पाठविण्याचे आश्‍वासन दिले. आपल्या न्याय मागण्या पूर्ण होईपर्यंत आपला, हा लढा कायम ठेवण्याचा निर्धारही संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी चर्चेतून व्यक्‍त केला.