Fri, Nov 16, 2018 02:29होमपेज › Konkan › पितापुत्रांनी लाकडातून साकारल्या मूर्ती

पितापुत्रांनी लाकडातून साकारल्या मूर्ती

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 8:50PMदेवरूख : वार्ताहर

पारंपरिक व्यवसायाला धार्मिकतेची जोड देत लाकडातून विविध मूर्ती घडविण्याचा छंद संगमेश्‍वर तालुक्यातील ताम्हाने सुर्वेवाडीतील अनंत सुतार हे जपत आहेत. या कामात त्यांना त्यांचा मुलगा दिनेश याचीही उत्तम साथ मिळत आहे. 

घराण्यातून लाभलेली सुतार कलेची परंपरा जोपासताना सुरुवातीला गृहोपयोगी फर्निचर, विविध लाकडी वस्तू तयार करण्याचे काम अनंत सुतार करत असत. त्यानंतरच्या काळात उत्सवांना आधुनिकतेचा साज चढू लागल्याने त्यांनी आपल्या व्यवसायाला धार्मिकतेचा कल देत विविध लाकडी मूर्ती घडविण्यास सुरुवात केली. 

त्यांनी लाकडात साकारलेल्या विविध मूर्तींना सध्या रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे आदी ठिकाणाहून मागणी होत आहे. आज वयाच्या साठीमध्येसुद्धा त्यांच्याच प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली दिनेश सुतारही ही कला जोपासत आहे.

दिनेशने आजपर्यंत शिवनीच्या लाकडातून एक श्रीकृष्ण, तीन गौरी व एक गणेशमूर्ती घडवल्या आहेत. शिवनीच्या लाकडातून आकर्षक अशी सुमारे 8 इंचांची गणेशमूर्ती तयार केली आहे. त्याने बनविलेली ही गणेशमूर्ती सध्या तालुक्यातील गणेशभक्‍तांचे लक्ष वेधून घेत आहे. ही गणेशमूर्ती बनविण्यासाठी त्याला दहा दिवसांचा कालावधी लागला. सध्या हे पितापुत्र आकर्षक कलाकृती बनवत आहेत.

कला जोपासल्यास फायदा

कोकणातील विविध उत्सवांना आता आधुनिकतेचा साज चढू लागल्याने आम्हीही पारंपरिक कामाला आधुनिक टच देत आहोत. लोकांची आवड लक्षात घेऊन विविध लाकडी मूर्ती घडविण्याचा व्यवसाय सध्या आम्ही जोपासत आहोत. या लाकडी कलाकृती साकारताना खूप वेळ लागतो. त्यामुळे या कामात चिकाटीही फार महत्त्वाची असते. आजच्या तरूण पिढीने वाडवडिलांकडून लाभलेली सुतारकामाची परंपरा जोपासली तर त्यात नक्‍कीच फायदा आणि समाधान आहे. -दिनेश सुतार