Wed, Apr 24, 2019 08:22होमपेज › Konkan › कणकवलीत होणार राज्यातील पहिला प्रकल्प : जिल्ह्यातील कचरा, सांडपाण्यावर होणार प्रक्रिया

कचर्‍यापासून वीज, पाणी आणि इंधन निर्मिती

Published On: May 11 2018 1:38AM | Last Updated: May 10 2018 11:13PMकणकवली : प्रतिनिधी

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये असलेली कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाटीची समस्या आता ग्रामीण भागातील शहरांमध्येही भेडसावू लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आता ‘एजी डाऊटर्स’ या जर्मन कंपनीने कोणत्याही प्रकारच्या कचरा आणि सांडपाण्यापासून वीज, पिण्याचे पाणी आणि इंधनाची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ही कंपनी येत्या वर्षभरात भारतात 25 प्लांट उभारणार आहे. आ.नितेश राणे यांच्या पुढाकाराने सर्व प्रकारच्या कचर्‍यावर प्रक्रिया करणारा नव्या तंत्रज्ञानाचा राज्यातील पहिला प्रकल्प कणकवलीमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील सर्व प्रकारचा कचरा संकलित करून त्यावर या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. येत्या वर्षभरात हा प्रकल्प साकारला जाणार आहे. 

ओसरगाव येथील महिला भवन येथे गुरूवारी एजी डाऊटर्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय गिरोत्रा यांनी याबाबतचे सादरीकरण केले. यावेळी आ. नितेश राणे यांच्यासह कुडाळ, देवगड, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग या नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अजय गिरोत्रा म्हणाले, कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार सिंधुदुर्गात दरदिवशी 180 मेट्रीक टन कचरा गोळा होतो. कचर्‍याबरोबरच सांडपाण्याचा प्रश्‍नही मोठा आहे. एजी डाऊटर्स या कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानुसार कोणत्याही प्रकारचा कचरा, त्यात जैविक कचरा, विषारी घटक, औद्योगिक टाकाऊ पदार्थ, हानिकारक गाळ व सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया केली जाते.

हवेमध्ये उत्सर्जन केले जात नाही. अवशेष शिल्लक राहत नाहीत तसेच जागा व्यापली जात नाही. सरकारचा एक रूपया न घेता कंपनी हा प्रकल्प उभारते. घनकचरा वेगवेगळा करण्याची गरज लागत नाही. कचर्‍याचे उष्णतेचे मूल्यांक मोजण्याचे तंत्रज्ञान यामध्ये उपलब्ध नाही. सर्व सेंद्रीय व जैविक कचरा नष्ट केला जातो. प्रक्रिया केलेला किंवा न केलेला कोणताही द्रव अथवा घन कचरा प्रकल्पातून बाहेर सोडला जात नाही.

या प्रकल्पासाठी जागा खूप कमी लागते. महानगरपालिकांमध्ये घनकचर्‍यासाठी भट्टी तंत्रज्ञान आहे. तर या कंपनीने गॅसीफिकॅषण हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. भट्टी तंत्रज्ञानातून 100 मेट्रीक टन कचर्‍यातून 1 मेगावॅट विजेची निर्मिती होते. तर नव्या तंत्रज्ञानात 3 मेट्रीक टन कचर्‍यातून 1 मेगावॅट विजेची निर्मिती होते. सुक्या व वर्गीकृत कचर्‍याची आवश्यकता नसते. दोन एकर जागेत हा प्रकल्प उभारता येऊ शकतो. वायू उत्सर्जन होत नाही. हवेचे प्रदूषण होत नाही. स्वनिर्मित वीजनिर्मिती होऊन हा प्रकल्प चालतो. वैद्यकीय प्रमाणीत पाण्याची निर्मिती करता येते. या प्रकल्पापासून इंधन निर्मिती केली जाते. नासा आणि युएस आर्मीने हे तंत्रज्ञान वापरले आहे. भारतातील कचर्‍याच्या समस्येवर हे तंत्रज्ञान खरच किफायतीशीर आणि उपयोगी असल्याचे गिरोत्रा यांनी सांगितले.

कणकवली नगरपंचायतीच्या मालकीच्या  कचरा डंपिंग ग्राऊंडवरील सुमारे तीन एकर जागेत हा प्रकल्प साकारला जाणार आहे. यासाठी एक रूपयाही कंपनी नगरपंचायतीकडून घेणार नाही. उलट कंपनीच्या वार्षिक टर्नओव्हरमधून एक टक्का निधी न. पं. ला देणार आहे. यासाठी शहरातील कचराही कंपनीच संकलित करणार आहे. कणकवलीबरोबरच जिल्ह्यातील इतर शहरे आणि मोठ्या गावांमधील कचराही संकलित केला जाणार आहे. त्यासाठी सर्व नगरपालिका व नगरपंचायतींबरोबर करार केला जाणार आहे. या प्रकल्पातून जवळपास 760 मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.  निर्माण होणारी वीज, इंधन हे कंपनी शासनाला कमी दरात उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय गिरोत्रा यांनी सांगितले.