Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Konkan › ‘जयगड-दाभोळ’ कोंडवाडीच्या मुळावर 

‘जयगड-दाभोळ’ कोंडवाडीच्या मुळावर 

Published On: Feb 10 2018 11:17PM | Last Updated: Feb 10 2018 10:50PM
खंडाळा : वार्ताहर

वाटदमधील कोंडवाडीच्या मधूनच जयगड ते दाभोळ ही गॅस पाईपलाईन जाणार आहे. त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांनी या पाईपलाईनच्या विरोधाचा अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर केला होता. नुकत्याच झालेल्या वाटद ग्रा. पं. च्या तहकूब ग्रामसभेत या अर्जावर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पामध्ये जाणार्‍या जमिनींचा आणि झाडांचा दर जाहीर झाल्याशिवाय या प्रकल्पाचे कोणतेही काम होऊ नये, अशी मागणी करून या प्रकल्पाला कोंडवाडीने विरोध दर्शवला.

यावेळी राजेंद्र बाचरे, गोपाळ वनये, लक्ष्मण बंडबे, सुनील वनये, पार्वती भूवड आदी शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका मांडली.शेतकर्‍यांच्या कोणत्याही मागणीचा विचार न करता एच एनर्जी कंपनी आणि प्रशासन करत असलेला जयगड ते दाभोळ हा विनाशकारी गॅस प्रकल्पच वाटदमध्ये नको, अशी भूमिका वाटद ग्रामसभेच्या अध्यक्षपदावरून सरपंच अनिकेत सुर्वे यांनी मांडली. यावेळी उपसरपंच बापू घोसाळे, सदस्या सुभद्रा कदम, वर्षा सुर्वे, ग्रामसेवक प्रक्षाळे, बचत गटांच्या महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

वाटद पंचक्रोशीतून एच एनर्जी कंपनी आणि प्रशासनातर्फे जयगड ते दाभोळपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यासाठी 18 मी. रुंदीची जागा घेण्यासाठी कंपनी आणि प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारे विश्‍वासात न घेता ही गॅस पाईपलाईन टाकण्याची घाई एच एनर्जी कंपनी करताना दिसत आहे. या गॅस पाईपलाईनमुळे आपल्या अस्तित्वाचा प्रश्‍न उपस्थित झाल्यामुळे वाटद पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी या प्रकल्पाबाबतच्या आपल्या हरकती प्रांताधिकार्‍यांकडे नोंदवल्या होत्या. याबाबत चर्चा करून हा प्रकल्पच येथे नको, अशी भूमिका येथील शेतकर्‍यांनी मांडली.

या प्रकल्पामध्ये जाणार्‍या जमिनींचा औद्योगिकीकरणाच्या पाचपट अधिक दराने मोबदला देऊन कंपनीने ती जमीनच खरेदी करावी आणि यामध्ये जाणार्‍या झाडांचा 100 पटीमध्ये मोबदला मिळावा अशी प्रमुख मागणी शेतकर्‍यांनी केली होती. परंतु, शेतकर्‍यांच्या मागणीचा कोणताही विचार न करता हा प्रकल्प सुरू करण्यासाठी यंत्र-सामुग्री वाटद खंडाळा परिसरात आणून ठेवून कंपनी शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून उमटत आहेत.