Sat, Apr 20, 2019 16:25होमपेज › Konkan › क्षयरुग्णांसाठी जिल्हा चिकित्सा केंद्र ठरतेय वरदान!

क्षयरुग्णांसाठी जिल्हा चिकित्सा केंद्र ठरतेय वरदान!

Published On: Mar 05 2018 8:51PM | Last Updated: Mar 05 2018 8:51PMरत्नागिरी : विशाल मोरे

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भारत क्षयरोग मुक्‍त करण्यासाठी आरोग्य खात्याकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरीतील जिल्हा क्षयरोग चिकित्सा केंद्रात अशा रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर मोफत औषधोपचार केला जात आहे. या केंद्रात उपचार करण्यात येणार्‍या रुग्णांपैकी 95 टक्के रुग्ण क्षयरोग मुक्‍त झाले असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली. यामुळे हे केंद्र क्षयरुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

क्षयरोग हा सुक्ष्मजंतू मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिसमुळे होतो. दोन आठवड्यांहून अधिक काळ खोकला, ताप, भूक मंदावणे, वजन कमी होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. केवळ फुफ्फूसच नव्हे तर केस आणि नखे सोडून शरीरातील कोणत्याही अवयवाला क्षय होऊ शकतो. जेव्हा फुप्फुसाचा एखादा क्षयरुग्ण खोकतो किंवा शिंकतो यावेळी क्षयरुग्णाच्या तोंडातून सूक्ष्म थेंब बाहेर पडतात. या सूक्ष्म थेंबांमध्ये हे क्षयरोगाचे जंतू असतात. हे सूक्ष्मथेंब हवेत बराच वेळ तरंगत असतात. ज्यावेळी निरोगी व्यक्‍ती ही हवा नाकाद्वारे आत घेते त्यावेळी श्‍वासातून क्षयरोगाचा जंतू त्या व्यक्‍तीच्या शरीरात जातो व त्यास क्षयरोगाचा संसर्ग होतो. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार असल्याने या आजाराचे जंतू कोणाच्याही शरीरात प्रवेश करु शकतात व क्षयरोग होऊ शकतो.

जिल्हा क्षयरोग चिकित्सा केंद्रात गतवर्षी 1685 रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. यातील 95 टक्के रुग्ण पूर्ण बरे झाले. औषध सुरू केल्यावर आपला आजार बरा झाला या समजुतीतून तसेच खासगी रुग्णालयाची फी भरण्यास पैसे नसल्यान अर्धवट उपचार केलेले यामुळे हा आजार दुप्पट बळावून सामान्य औषधाला दाद न देणार्‍या विशेष रुग्णांसाठी जिल्ह्यात उइछअअढ सेंटर जिल्हा क्षयरोग चिकित्सा केंद्र आणि चिपळुणातील वालावलकर रुग्णालय या दोन ठिकाणी उभारण्यात आले आहे. पूर्वी रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवावे लागत असत. त्याचे निदान होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागे. परंतु आता जिल्ह्यातच उइछअअढ सेंटर उभारल्याने 2 तासांतच निदान होते. त्यामुळे औषधोपचारही वेळेवर सुरू करता येतो. 

जिल्हा क्षयरोग चिकित्सा केंद्रात रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी सात क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, आठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक, एक पीपीएम को-ऑर्डिनेटर, एक एमबीआर मार्गदर्शक यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात 7 ठिकाणी क्षयरोग तपासणी प्रयोगशाळा असून, 39 ठिकाणी थुंकी तपासणी केंद्र आहेत.

सरकारी दवाखान्यात उपचार घेणारे क्षयरुग्ण वगळता खासगी वैद्यकीय व्यवसायिकांकडे क्षयरोगाचे उपचार घेणार्‍या रुग्णांची यादी जिल्हा क्षयरोग केंद्राला देणे बंधनकारक आहे. यामुळे उपचार घेणार्‍या क्षयरुग्णांची वेळोवेळी देखभाल करणे सोयीचे होत आहे. क्षयरुग्णांवर मोफत उपचार होत असल्याने क्षयग्रस्तांनी वेळीच तपासणी करून लवकर उपचार सुरू करावेत, असे आवाहनही डॉ. सुतार यांनी केले आहे.