Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Konkan › मतदान यंत्रात घोळ ; काँग्रेसचा आरोप

मतदान यंत्रात घोळ ; काँग्रेसचा आरोप

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 8:41PMकणकवली : वार्ताहर

कणकवली न.पं. निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांना कमी मते मिळण्यास मतदान यंत्रातील घोळ कारणीभूत आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदांसाठीही उभ्या असलेल्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षाही कितीतरी कमी मते मिळाली असल्याने संशयास जागा निर्माण झाली आहे. याविरूध्द निवडूक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. आवश्यकता भासल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले.

निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्यावतीने येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष सावंत यांनी ही माहिती दिली. तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार विलास कोरगावकर, आतिष जेठे, लिलाधर बांदेकर आदी उपस्थित होते. निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला तरी यापुढे पक्षाचे व सामाजिक कार्य सुरूच ठेवले जाणार आहे.  मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आम्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो. मात्र एक गोष्ट जाणीवपूर्वक दिसून आली ती म्हणजे काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता मतदान यंत्रातील घोळ कारणीभूत असल्याचा संशय आहे.  प्रभाग 2 मधील काँग्रेसच्या उमेदवार दिव्या साळगावकर यांना केवळ 2 मते मिळतात हे आमच्या पचनी पडणार नाही.काँग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी व साळगावकर यांचे नातेवाईक या प्रभागात असूनही मिळालेली मते पाहता ते संशयास्पद आहे.  तर प्रभाग 9 मध्येही अशीच परिस्थिती दिसून आली. या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव हा मतदान यंत्रातील छेडछाडीमुळे असून त्याविरूध्द दाद मागणार असल्याचे विकास सावंत यांनी सांगितले. 

नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार विलास कोरगावकर म्हणाले, मी गेली अनेक वर्षे प्रभाग 9, 10, 11 मध्ये सातत्याने कामे केली आहेत. असे असतानाही प्रभाग 9 मध्ये 20, 10 मध्ये 24, 11 मध्ये 24 मते मिळाली आहेत. ही आकडेवारी पाहता मतदानयंत्रामध्ये घोळ होत झाला आहे हे निश्‍चित. निवडणुकीत विजय, पराजय हा असतोच. मात्र, काँग्रेसच्या पराभवाला मतदान यंत्रणाच कारणीभूत आहेत, असे कोरगावकर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त करताना मतदान यंत्रातील घोळाकडे लक्ष वेधले.

Tags : Konkan, Fraud,  polling, booth, Congress, allegations