Fri, Sep 21, 2018 21:10



होमपेज › Konkan › मुंबईत लोकलच्या धडकेने चार भावंडांचा अंत

मुंबईत लोकलच्या धडकेने चार भावंडांचा अंत

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 14 2018 11:16PM



कणकवली : वार्ताहर

मुंबईतील पश्‍चिम रेल्वेमार्गावर लोकलच्या धडकेत कणकवली तालुक्यातील फोंडाघाट-नवीन कुर्ली वसाहत येथील चार भावंडांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी 5.30 वा. च्या सुमारास कांदिवली-बोरिवली स्टेशनदरम्यान घडला. अपघातात मुंबईत राहणारा सागर संपत चव्हाण (वय 24), व नवीन कुर्ली वसाहत येथील दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (19), साईप्रसाद मनोहर चव्हाण (18),  मनोज दीपक चव्हाण (18) या भावंडांचा दुर्देवी अंत झाला.  

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नवीन कुर्ली वसाहतीमध्ये शोककळा पसरली आहे. कुर्ली गावचे मूळचे रहिवासी असलेले चव्हाण कुटुंबीय हे धरणग्रस्त असून फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत पुनर्वसन क्षेत्रात गेली काही वर्षे घर बांधून राहत आहेत. याच कुटुंबीयातील एका लग्नसोहळ्यासाठी सागर चव्हाण हा नवीन कुर्ली वसाहतीतील आपल्या घरी आला होता. त्याच्या सोबत दत्तप्रसाद, साईप्रसाद हे दोन सख्खे भाऊ व मनोज असे चुलत-चुलत भाऊ मुंबईला निघाले होते. मेंगलोर एक्स्प्रेसने रविवारी रात्री ते कणकवली स्टेशनवरून मुंबईला जाण्यासाठी निघाले. दादर स्टेशनवरून सोमवारी पहाटे त्यांनी कांदिवली पोईसर येथील सागर चव्हाण याच्या घरी जाण्यासाठी बोरिवली लोकल पकडली. कांदिवली-बोरिवली स्टेशनदरम्यान सिग्नलला लोकल थांबल्यानंतर चौघांनीही बाहेर उड्या मारत रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरून आलेल्या दुसर्‍या लोकलची धडक त्यांना बसली. 
ही धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या आई वडिलांचा प्रकृती अत्यवस्थ झाल्याने डॉक्टरांना आणण्यास आले.

सख्खे भाऊ असलेल्या दत्तप्रसाद व साईप्रसाद यांचे वडील मनोहर चव्हाण हे एस.टी. कणकवली डेपोत वाहक म्हणून कार्यरत आहेत. दत्तप्रसाद याचे  गारगोटी येथे मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शेवटचे वर्ष होते व साईप्रसाद याने कोल्हापूर कलानिकेतन कॉलेजची परीक्षा दिली होती.  तर मनोज चव्हाण हा राजापूर पाचल येथे अकरावी सायन्समध्ये शिकत होता.    

आज अंत्यसंस्कार

अपघातातील मृत सागरची आई मुंबईला राहते. तर इतरांचे आईवडील व कुटुंबीय गावी असल्याने कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी त्यांचे मृतदेह नवीन कुर्ली वसाहत येथे आणण्यात येणार असून तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

अपघाताविषयी ग्रामस्थांना संशय

पश्‍चिम रेल्वेमार्गावर जेथे हा अपघात झाला तेथे सीसीटीव्ही नसल्याने त्याचे फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही. त्यातच चौघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत  झाली होती.  शरीरावर इतर दुखापत नसल्याने हा अपघात रेल्वे ओलांडताना झाला की इतर कारणांमुळे याविषयी नवीन कुर्ली वसाहतीतील ग्रामस्थांनी साशंकता व्यक्‍त केली आहे.