Wed, Jul 17, 2019 20:11होमपेज › Konkan › पावशीत चार पर्यटक गंभीर 

पावशीत चार पर्यटक गंभीर 

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 11 2018 10:47PMकुडाळ : प्रतिनिधी

गोव्याहून कणकवलीच्या दिशेने भरधाव जाणार्‍या कारने रस्त्याच्या उजव्या बाजूच्या पावशी गणपती मंदिर जवळील आकेशियाच्या झाडाला जोरदार धडक दिली. या धडकेत सोलापूर-अकलूज येथील कारमधील पाचपैकी चारजण गंभीर जखमी झाले. या चारही  जणांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात पावशी कुंभारवाडी गणपती मंदिरजवळ सोमवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडला.

मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 वरून गोव्याहून कणकवली मार्गे सोलापूरच्या दिशेने आपल्या ताब्यातील कारने उमेश साळुंके (24, ड्रायव्हर) जात होते. यावेळी त्यांच्यासोबत वैभव तुकाराम शिंदे (22, अकलूज),  गणेश भुजबळ (22, माळुंगा), किरण राजकुमार यादव (19, माळुंगा), माऊली भगत (21, सर्व रा. सोलापूर) होते. उमेश साळुंके याची  कार पावशी गणपतीमंदिर जवळ आली असता महामार्गाच्या विरूध्द दिशेने कार जात कारची महामार्गालगतच्या आकेशिया झाडाला जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की या धडकेत आकेशियाचे झाड मोडून पडले.

या आवाजाने  स्थानिक  ग्रामस्थांनी धाव घेतली. शेतात काम करीत असलेले सुयोग ढवण व संदेश कुंभार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमींना  बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. चालक व चालकासोबत बसलेले दोघेजण गाडीत अडकले होते त्यांना मोठ्या शर्थीने बाहेर काढण्यात आले. याच दरम्यान ओरोसहून कुडाळच्या दिशेने मार्गस्थ होणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्समधून वैभव शिंदे, गणेश भुजबळ, उमेश साळुंके यांना तत्काळ  कुडाळ ग्रामीणमध्ये हलविण्यात आले. त्यामागोमाग किरण यादव व माऊली भगत यांना कुडाळ ग्रामीणमध्ये आणले. याअपघातात चौघांच्या डोकी, हाताला  गंभीर दुखापत झाली. सुदैवाने माऊली भगतला किरकोळ दुखापत झाली. या चारही जणांवर कुडाळ रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले. 

हे पाचही जण शनिवारी सोलापूरहून  गोव्याला फिरायला गेले होते. दोन दिवस गोवा फिरून कुडाळ - कणकवली मार्गे ते सोलापूरला जात होते. मात्र,  पावशी गणपती मंदिर येथे त्याच्या गाडीला मोठा अपघात  झाला. यात चारही जण जखमी झाले. या अपघातात  कारचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसचे हे.काँ. डिसोजा व चव्हाण घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पंचनामा केला.