Sat, Mar 23, 2019 18:07होमपेज › Konkan › सोमवार ठरला ‘घात’वार

सोमवार ठरला ‘घात’वार

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 10:39PMचिपळूण/संगमेश्‍वर : वार्ताहर

चिपळूण शहरातील जलतरण तलावात बुडून 17 वर्षीय तरुणाचा तर संगमेश्‍वरातील शास्त्री नदीत बुडून 8 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. शास्त्री नदीत बुडालेल्या दुसर्‍या 12 वर्षीय चिमुरडीचा जीव वाचवण्यात यश आले. रेल्वेतून पडून एका तरुणाचा मृत्यू तर महामार्गावरील तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात सोमवारी एकूण चारजणांना जीव गमवावे लागल्याने सोमवार (दि. 28) हा ‘घात’वार ठरला आहे.

संगमेश्‍वरात शास्त्री नदीत बुडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू

संगमेश्‍वर बाजारपेठेत राहणार्‍या दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणी शास्त्री नदीपात्रात अंघोळीसाठी उतरल्या आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एकीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी 12.30 वा. घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार संगमेश्‍वर भंडारवाडा येथे कांजीया मसाला विक्रीचे दुकान आहे. या दुकानाचे मालक विजय कांजीया यांच्या दोन मुली पूर्वा कांजिया (8) आणि जयश्री कांजिया (12, दोघी रा. संगमेश्‍वर, रामपेठ) या दुपारी पागआळीनजीक शास्त्री नदीकिनारी गेल्या होत्या. त्यावेळी नदीला भरती आल्याने त्या मुलींना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्या पाण्यात वाहत गेल्या. हा प्रकार पाहणार्‍या काही मंडळींनी आरडाओरड केल्यावर तेथील जमा झालेल्या लोकांपैकी काही पोहणार्‍या मंडळींनी नदीत उड्या मारल्या. या दोन मुलींपैकी जयश्री हाताला लागल्याने तिला बाहेर काढण्यात आले. तिला उपचारासाठी संगमेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात  आले. परंतु, तिची प्रकृती बिघडल्याने तिला रत्नागिरीत हलवण्यात आले. दुसरी 8 वर्षांची पूर्वा ही काही अंतरावर मृतावस्थेत सापडली. या दोन्ही मुली संगमेश्‍वर जि.प. केंद्रशाळा येेथे शिकत होत्या. या घटनेची खबर मिळताच संगमेश्‍वर पोलिस घटनास्थळी पोहोचले. अधिक तपास संगमेश्‍वर पोलिस करीत आहेत.

चिपळुणातील जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू 

चिपळूण नगर परिषदेच्या जलतरण तलावात सावर्डे येथील एका 17 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाला. कपिल रघुनाथ सांबरेकर (बेळगाव, सध्या रा.सावर्डे ) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मृत्युच्या धक्क्याने अस्वस्थ झालेल्या त्याच्या वडिलांनाही  रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 4.30 वा. च्या सुमारास घडली.

कपिल हा आपल्या अन्य तीन मित्रांबरोबर सोमवारी जलतरण तलावात पोहण्यासाठी आला होता. यावेळी त्याचे अन्य मित्र तलावात पोहायला उतरले. मात्र, कपिल काठावरच काही काळ बसून होता.जलतरण तलाव बंद होण्याची वेळ झाल्यानंतर कपिल याने अचानकपणे पाण्यात उडी मारली. त्याला पोहायला येत नसल्याने पाण्यात उडी मारताच तो गटांगळ्या खाऊ लागला. हे तलावाच्या ठेकेदाराच्या कर्मचार्‍याच्या लक्षात आले. त्याने तातडीने त्याला तलावातून बाहेर काढले. आपला मित्र पोहायला येत नसतानादेखील तलावात उडी मारल्याने बुडत असताना पाहून तिघे मित्र घाबरले. दरम्यान, सुरक्षा रक्षक कर्मचार्‍याने तातडीने प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल केले.  मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी खासगी रुग्णालयातून कामथे येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. 

खेरशेत येथे आरामबसची कारला धडक; महिला ठार 

मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत येथे खासगी आराम बस एसटीला ओव्हरटेक करताना होंडा सिटी कारवर आदळून झालेल्या अपघातात कारमधील 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. भूलीदेवी सीताराम मीरा (पुणे)असे मृत महिलेचे नाव आहे.

सावर्डे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताची खबर अंकुशकुमार सीताराम मीरा (17)याने पोलिसांना दिली. सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खेरशेतनजीक हा अपघात घडला. सीताराम मीना हे आपल्या कुटुंबासह गोव्याहून मुंबईकडे होंडा सिटी कारने चालले असता त्यांची कार खेरशेतनजीक आली. यावेळी समोरून येणार्‍या मुंबई-राजापूर या एसटीला ओव्हरटेक करताना खासगी आरामबसने कारला जोरदार धडक दिली. याचवेळी आराम बसला बाजू देताना एसटी बस रस्ता सोडून बाजूला उलटली आणि तिहेरी अपघात झाला. यामुळे एसटीतील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर कारमधील भूलीदेवी सीताराम मीना या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल केले असता त्या मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. या अपघातामुळे सोमवारी सकाळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 

सावर्डे येथे रेल्वेतून युवकाचा मृत्यू

कोकण रेल्वे मार्गावर तुतारी एक्सप्रेसमधून गावाला येताना सावर्डे रेल्वे स्थानकात पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम संजय सोलकर (18 रा. डेरवण, गणेशवाडी) असे त्याचे नाव आहे. याबाबत सावर्डे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  संतोष शिवाजी सोलकर यांनी ही खबर सावर्डे पोलिसांना दिली. शुभम हा तुतारी एक्सप्रेसने आपल्या डेरवण या गावी येत होता. सोमवारी सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास तुतारी एक्सप्रेस सावर्डे स्टेशनवर आली असता शुभम उतरत असताना घसरला. या त्याचा पाय मधल्या मोकळ्या जागेत जाऊन तो ट्रॅक खाली पडला. यामध्ये त्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. त्याला तात्काळ डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पाय तुटल्याने अधिक रक्‍तस्त्राव होऊन सोमवारी सकाळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.