Thu, Jun 20, 2019 00:28होमपेज › Konkan › चौपदरीकरण आराखडा कुडाळच्या व्यापारास बाधक!

चौपदरीकरण आराखडा कुडाळच्या व्यापारास बाधक!

Published On: Jul 16 2018 11:18PM | Last Updated: Jul 16 2018 10:36PMकुडाळ : वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा कुडाळ शहरादरम्यानचा आराखडा  शहराच्या विकासास बाधक ठरणारा आहे. या मुळे कुडाळ शहरातील व्यापारीकरणास मोठा फटका बसण्याची भीती व्यापारी संघटनेच्या बैठकीत व्यक्‍त करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा कुडाळ शहराच्या व्यापारावर काय परिणाम होईल? याबाबत चर्चा करण्यासाठी व्यापारी संघटनेच्यावतीन मारूती मंदिर धर्मशाळेत बैठक घेण्यात आली. शहरातून जाणार्‍या महामार्ग चौपदरीकरण आराखड्याबाबत  प्रशासनाने अंधारात ठेवले असून त्याची नेमकी रूपरेषा स्पष्ट नाही. चुकीच्या पद्धतीने शहरात चौपदरीकरण झाल्यास  भविष्यात याचा कुडाळ शहराच्या व्यापारावर निश्‍चितच विपरीत परिणाम होणार आहे.  काका कुडाळकर यांनी या आराखड्याची रुपरेषा विषद केली. यानुसार काळापनाका येथे सुमारे 24 फूट उंचीचा बॉक्सवेल असून यामुळे फारशी समस्या उद्भवणार नाही. मात्र शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या राज नाका येथील आराखडा शहर विकासास बाधक ठरण्याची शक्यता आहे. राजनाका येथे वाहने खाली उतरण्याची सुविधा आराखड्यात नाही. त्यामुळे  पुलावरून जाणारी वाहने थेट जाणार असून त्याचा थेट परिणाम शहराच्या व्यापारावर होण्याची शक्यता आहे.  कुडाळ शहर हे तालुक्याचे मुख्य व्यापार केंद्र अन्य ठिकाणी स्थलांतरीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजनाका येथे सर्कल ठेवण्याची  एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली. ज्या ठिकाणी वाहतून व्यवस्था सुरळीत असते त्या ठिकाणीच ग्राहक वर्ग स्थिरावतो. त्यामुळे सद्यस्थितीतल  आराखड्याप्रमाणे काम झाल्यास भविष्यात कुडाळ शहराचे व्यापारी अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यापार्‍यांनी व्यक्‍त केली. यासाठी आपण आताच संघटित होवून आपल्या एकीची ताकद दाखवली नाही तर आपल्यावर अन्याय होईल. यासाठी सर्व व्यापारी वर्गाने 17 जुलैच्या हायवे बंद आंदोलनात सहभागी होण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला. बचाव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव बिले यांनी हा कोणताही राजकीय विषय नसून मागण्यांसाठी कुडाळवासीयांच्या एकीचा विषय आहे. आपण आतापर्यंत जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवलेली निवेदने पडून असून त्याची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. या आंदोलनातून कुडाळ शहराच्या एकीची ताकद दाखवा असे आवाहन त्यांनी  केले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे यांनी आराखड्याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे सांगत याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले व व्यापारीवर्गाने यात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. बैठकीला शहरातील बहुतांशी व्यापारी उपस्थित होते.