Sun, Sep 22, 2019 21:48होमपेज › Konkan › खंडाळ्यानजीक सिंधुदुर्गातील चार ठार

खंडाळ्यानजीक सिंधुदुर्गातील चार ठार

Published On: May 20 2019 2:07AM | Last Updated: May 20 2019 2:07AM
खंडाळा : वार्ताहर

सावंतवाडी तळवडे येथील लग्न समारंभ आटोपून मुंबईकडे परतत असताना बोलेरो जीपची महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सिंधुदुर्गातील कामत व सामंत कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा जिल्हा हद्दीत पारगाव खंडाळ्यानजीक ही दुर्घटना घडली.  

विनायक कामत (रा. तळवडे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हे मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी आपली पत्नी स्मिती कामत, मेहुणे बाळकृष्ण शंकर सामंत (वय 66, रा. दहिसर, मुंबई) व विलास सामंत (रा. पाट, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांच्यासमवेत मुंबईहून गावी सावंतवाडीला लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नकार्य झाल्यानंतर रविवारी पहाटे ते महिंद्रा बोलेरो जीप (क्रमांक एम-एच 47-एबी 1784) ने बोरिवली, मुंबईकडे निघाले होते.  जीप सातारा-पुणे महामार्गावरील जुन्या खांबाटकी टोलनाक्याजवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याच्या कडेला मालट्रक (क्रमांक के.एल .16 यु. -4420) ला पाठीमागून धडकली. या अपघातात विनायक कामत, बाळकृष्ण सामंत, विलास सामंत हे जागीच ठार झाले. तर स्मिती कामत व चालक रवी गावकर (रा. जुहू सर्कल, मुंबई) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. 

श्रीमती कामत यांच्यावर खंडाळा येथे खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघात घडताच स्थानिक हॉटेल चालक, नागरिकांनी जखमींना जीपमधून बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर पोलिसांनी ट्रकमध्ये अडकलेली जीप क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, बाळकृष्ण सामंत यांची पत्नी व दोन  मुली सुट्टी निमित्त  16 रोजी  पाचगणी येथे पर्यटनासाठी आल्या होत्या. अपघातानंतर काही वेळातच ही घटना त्यांना समजली. त्या तिघीही तातडीने खंडाळा येथील मानसी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. यानंतर मयत व जखमींची ओळख पटली. या दुर्घटनेमुळे तळवडे व पाट परिसरात शोककळा पसरली आहे. 

हॉटेल शोधताना सुटले गाडीवरील नियंत्रण

अपघात घडला त्यापूर्वी चालक रस्त्याच्या बाजूला असणार्‍या हॉटेलसमोर अनेक कार थांबल्या होत्या, त्याकडे पाहत होता. अचानक जीप दुसर्‍या लेनमधून तिसर्‍या लेनमध्ये गेली. त्यावेळी रस्त्यावर पुढे कोणतेही वाहन नव्हते. मात्र, समोरच  कडेला उभा असलेला ट्रक पाहताच चालकाने ब्रेक लावत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.  परंतु गाडी कंट्रोल न झाल्याने हा अपघात झाल्याचे एका हॉटेल कामगाराने सांगितले.