Sat, Jul 20, 2019 23:43होमपेज › Konkan › तीन नळपाणी योजनांसाठी साडेचार कोटी

तीन नळपाणी योजनांसाठी साडेचार कोटी

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 11:04PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यातील रवींद्रनगर-कुवारबांव, पिंपळी-चिपळूण आणि नांदगाव-दिवाळेवाडी-खेड येथील नळपाणी पुरवठा योजनांना मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण 4 कोटी 48 लाख 64 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यांपैकी काही योजना केंद्र व राज्य शासन यांच्या संयुक्‍त आर्थिक भागीदारीतून सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत पावसाचे कमी होत चाललेले प्रमाण, भूजलाची घटती पातळी, वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी, यांसारख्या कारणांमुळे ग्रामीण पाणीपुरवठ्यावर प्रचंड ताण येत आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम सुरु करण्यात आला. त्या अंतर्गत या तीन योजनांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास अधीक्षक अभियंता, भारत निर्माण कक्ष, सिडको भवन, बेलापूर यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. पाणीपुरवठा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत  दरदिवशी माणशी 40 लिटर क्षमतेच्या या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. 

रत्नागिरी तालुक्यातील कुवारबांव-रवींद्रनगर येथील योजनेसाठी 2 कोटी 36 लाख 29 हजार, चिपळूण तालुक्यातील मौजे पिंपळी बु॥ येथील योजनेसाठी 65 लाख 26 हजार आणि खेड तालुक्यातील नांदगाव-दिवाळेवाडी येथील नळपाणी योजनेसाठी 1 कोटी 47 लाख 9 हजार रुपयांच्या ढोबळ किमतीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमध्ये 100 टक्के घरगुती नळजोडण्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर किमान 3 वर्षे योजना चालवणे कंत्राटदारावर बंधनकारक राहणार आहे. 

2500 रुपये पाणीपट्टी भरण्याचे हमीपत्र

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणारी ही योजना चालवणे व देखभाल दुरुस्तीसाठी यासाठी येणारा खर्च भागविण्याकरिता संबधित ग्रामपंचायतीने योजनेच्या अंमलबजावणीसाठी किमान 2500 रुपये इतकी घरगुती, बिगर घरगुती व संस्थात्मक नळजोडणी धारकांसाठी पाणीपट्टी आकारण्याबाबत हमीपत्र घ्यायचे आहे.