Thu, Jan 23, 2020 05:18होमपेज › Konkan › वादळी, अवकाळीने जिल्ह्यात साडेचार लाखांची हानी

वादळी, अवकाळीने जिल्ह्यात साडेचार लाखांची हानी

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 18 2018 9:35PMरत्नागिरी : प्रतिनिधी / चिपळूण : शहर वार्ताहर

वादळी वार्‍यासह आलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारी जिल्ह्यात सुमारे साडेचार लाखांची हानी झाली. याचा सर्वाधिक फटका चिपळूण आणि संगमेश्‍वर तालुक्याला बसला. रत्नागिरी तालुक्यातही वादळी वार्‍याने काही भागात घरांच्या छपरांची आणि झाडांची पडझड झाली.  दरम्यान, आगामी दोन दिवसांत कोकणात  जोरदार वार्‍यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी जिल्ह्यात तिसर्‍यांदा आलेल्या अवकाळी पावसाची नोंद 34 मि.मी. झाली आहे. 

वादळी वार्‍यामुळे चिपळूण तालुक्यात सुमारे साडेतीन लाखांची हानी झाली. मंगळवारी दुपारनंतर सुरू झालेल्या वादळी वार्‍याच्या पावसात चिपळूणच्या पूर्व भागाला मोठा फटका बसला. तसेच सावर्डे परिसरातही मोठे नुकसान झाले. चिपळूण  तालुक्यात आलेल्या वादळाने तालुक्यात सहा घरांचे आणि एका गोठ्याचे नुकसान झाले. यामध्ये चार घरांवर झाड पडल्याने आणि दोन घरांचे पत्रे उडून गेल्याने या घरांची हानी झाली. वादळाचा जोर चिपळूणच्या मार्कंडी, दळवटणे, पिंपळी, खडपोली, पाली, निरबाडे या भागात होता. या भागात जोरदार वार्‍यामुळे विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे या भागात वीज प्रवाहही खंडित झाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍याच्या पावसाने चिपळूण तालुक्यात लाखोंची हानी झाल्याची शक्यता असून बहुतांश घरांवरील कौले, पत्रे वादळी वार्‍यात उडाले. वार्‍याच्या जोरामुळे वृक्ष उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले. 

चिपळूण तालुक्याच्या पूर्व भागातील खडपोली, पाली, निरबाडे,  वालोटी, अडरे, चिंचघरी, खेर्डी आदींसह सावर्डे, फुरुस तर शहर परिसरातील व शहरातील काही उपनगरासहीत कालुस्ते बु॥ येथील नागरिकांचे नुकसान झाले.  नुकसानग्रस्त भागाची माहिती व पंचनाम्याचे काम त्या-त्या भागातील ग्रामसेवक व तलाठ्यांकडून सुरू करण्यात आले असून त्यानुसार तहसील कार्यालयात नुकसानीच्या नोंदी घेण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक नोंदीनुसार वालोटी परिसरातील दत्ताराम कदम यांच्या घरावरील पत्रे,  राजाराम आदवडे यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. अनिल आंबेडे यांच्या घरावरील पत्रे, अडरे  परिसरातील लक्ष्मण कोकजे यांच्या घरावरील पत्रे, चिंचघरीमधील रेश्मा चाळके यांच्या घरावरील कौले तसेच बचत भवनचे पत्रे, खेर्डीमधील जयंत भुरण यांच्या घराचे सुमारे नऊ हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदेश सुरेश भुरण यांच्या घराचेदेखील नुकसान झाले. दत्ताराम कांबळी यांच्या घराचे 5250, नारायण बाबू मेस्त्री यांच्या घरावरील पत्रे, वालोटी येथील शैलेश कदम यांच्या घरावरील पत्रे, खडपोली येथील अंकुश कदम यांचे घर, शौकत खडपोलकर यांच्या घराचे नुकसान, आनंद बापट यांच्या केळी बागेतील केळीची झाडे भुईसपाट झाल्याने तीस हजारांचे नुकसान, पाली येथील श्रीपत माळी यांचा गोठा, निरबाडे वसंत जाधव यांचे घर, सावित्री  झुजम यांचे घर, विजय झुजम यांचे घर, अरुणा झुजम यांचे घर, शहरातील शंकरवाडी येथील घर, कालुस्ते बु॥ येथील सीताराम बामणे यांच्या घराचे 6500 रु. चे नुकसान, सावर्डे येथील अरुण वारे यांची पत्रा शेड, फुरुस येथील लक्ष्मीबाई चव्हाण यांच्या  घराचे नुकसान, धामेली येथील मोहन भालेकर यांच्या घराचे 10 हजार रूपयांचे नुकसान झाले. सहदेव गायकर यांच्या घराचे पाच हजाराचे नुकसान, रवींद्र तटकरे यांच्या घराचे 8500 रुपयांचे नुकसान, नरेंद्र गायकर यांच्या घराचे 13 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे.चिपळूण तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील तलाठी, पोलिसपाटील पंचनामे करीत आहेत.

संगमेश्‍वर आणि रत्नागिरी तालुक्यांत वादळाचा फटका अनुक्रमे कडवई आणि नाणिज या भागाला बसला. वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने संगमेश्‍वर आणि रत्नागिरी तालुक्यांतही झाडे उन्मळून पडल्याने सुमारे लाखाचे नुकसान झाले. काही भागात झाडे पडल्याने विजेच्या ताराही तुटल्या. त्यामुळे या भागात काही तास वीज प्रवाहही खंडित झाला. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. मंगळवारी जिल्ह्यात 34 मि.मी. एकूण  पावसाची नोंद झाली. यामध्ये खेडमध्ये 20, चिपळुणात 2, संगमेश्‍वर तालुक्यात 12 मि.मी. पाऊस झाला. सरासरी नोंद 3.78 एवढी झाली. दरम्यान, आगामी दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाला जोरदार वार्‍याचीही साथ राहणार  असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा  देण्यात आला आहे.