Sat, Jul 20, 2019 08:33होमपेज › Konkan › दोडामार्ग तालुका मनसेच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या

दोडामार्ग तालुका मनसेच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या

Published On: Jan 26 2018 12:26AM | Last Updated: Jan 26 2018 12:26AMदोडामार्ग : प्रतिनिधी 

दोडामार्ग तालुका मनसेचे माजी अध्यक्ष प्रभाकर नामदेव गवस (वय 40) यांनी राहत्या भाड्याच्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री 11 वा. दरम्यान तिलारी कॉलनीमध्ये घडली. आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. गवस हे गेल्या चार वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय होते. तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी काम केले होते. पदाला न्याय देत  दोडामार्ग तालुक्यात मनसे संघटना त्यांनी वाढवली होती.

मध्यंतरी पक्षातील गटबाजीमुळे त्यांनी पक्षाशी फारकत घेतली होती. सध्या ते आपल्या खडी क्रशरच्या व्यवसायात व्यस्त होते. बुधवारी ते नेहमीप्रमाणे तिलारी कॉलनी येथील भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या ठिकाणी आले. कुटुंबीय झोपी गेल्यानंतर त्यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच  त्यांना साटेली - भेडशी आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैेद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. 

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून शवविछेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. श्री गवस यांनी आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचे मूळ गाव सोनावल हे आहे. सध्या ते आपल्या पत्नी व मुली सोबत तिलारी कॉलनीमध्ये राहत होते. त्यांच्या पश्यात आई,वडील,पत्नी,दोन लहान मुली असा परिवार आहे.