Tue, Nov 13, 2018 02:30होमपेज › Konkan › ‘चोर सोडून संन्यासाला फाशी’

‘चोर सोडून संन्यासाला फाशी’

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 10:38PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

वृक्षतोडीबाबत केसरी येथील शेतकर्‍यांना वनविभागाने दिलेली नोटीस म्हणजे “चोर सोडून संन्यासाला फाशी” देण्याचा प्रकार आहे. नोटीस देण्यात आलेल्या शेतकर्‍यांचा या वृक्षतोडीशी काही संबंध नसून त्या अन्यायकारक आहेत. वनविभागाने वृक्षतोडीमागे कोण आहेत याचा शोध घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा केसरी येथील शेतकर्‍यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

मुंबई उच्च न्यायालयाचे बंदी आदेश असताना केसरी येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. शेकडो एकरमध्ये वृक्षतोड सुरू असताना वनविभागाने कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, आता चुकीच्या पद्धतीने काही शेतकर्‍यांना नोटिसा काढून तोडीचे साहित्य व दंडाची रक्‍कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकार अन्यायकारक आहे. ज्या शेतकर्‍यांनी तोड केली नाही त्यांना वनविभागाने नोटिसा पाठविल्या आहेत. सर्व्हे नंबर 18 मध्ये तोड कमी असताना केवळ याच सर्व्हे नंबरमधील शेतकर्‍यांना नोटिसा दिल्या आहेत. एकूण 9 शेतकर्‍यांना नोटिसा काढण्यात आल्या असून 3 शेतकर्‍यांना त्या प्राप्त झाल्या आहेत. इतर सर्व्हे नंबरमध्ये मोठ्या प्रमाणात तोड झाली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

केसरीत लाखोंच्या झाडांची तोड झाली असून तोडलेले लाकूड यापूर्वीच नेण्यात आले आहे. वनविभागाचे अधिकारी सामील झाल्याशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही, असा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.सुरेश सावंत, शिवराम सावंत, श्रीकृष्ण सावंत, राजेंद्र सावंत, विश्‍वनाथ मेस्त्री आदी शेतकरी उपस्थित होते.  या शेतकर्‍यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची भेट घेऊन जे कोणी यासाठी जबाबदार असतील त्याचा वनविभागाने शोध घ्यावा. मात्र, शेतकर्‍यांना नाहक त्रास देऊ नये अन्यथा वनविभागासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा दिला.