होमपेज › Konkan › सोशल मीडियावरील वाघाचा वनविभागाकडून शोध

सोशल मीडियावरील वाघाचा वनविभागाकडून शोध

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 11:17PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

सध्या एकच वाघ सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर फिरत आहे. प्रथम कोल्हापूरातील बालिंगा त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे व आता सावंतवाडी तालुक्यातील 
मळगाव व नेमळे येथे पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र सर्वत्र व्हायरल होणारा पट्टेरी वाघाचा फोटो एकच असल्याने वनविभाग हैराण झाला आहे.

पट्टेरी वाघाचे अस्तित्व दर्शविणारे अनेक पुरावे असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पट्टेरी वाघाच्या अस्तित्वावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. वाघाच्या अस्तित्वाबाबत ठोस पुरावे नसल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. तर सहयाद्री पट्टयातील अनेक गावांमधील ग्रामस्थांनी वाघ पाहिल्याचा दावा वेळोवेळी केला होता. दोन वर्षांपूर्वी तिलारी परिसरात वाघाचे अस्तित्व समोर आल्यावर वनविभागाची भूमिका अलीकडे काहीशी बदलली आहे. तरीही या जिल्ह्यात वाघाचे अस्तित्व आहे हे दर्शविणारे छायाचित्र समोर आले नव्हते. मात्र काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पट्टेरी वाघाचे छायाचित्र व्हॉटस्अ‍ॅपवर टाकण्यात आल्याने खळबळ उडाली होती. 

सध्या वाघाचा हा फेक फोटो केवळ मथळा बदलून राज्यभर फिरत आहे. गोंदिया येथील नागझिरा टायगर रिझर्व्ह पार्क मधील वाघाचा हा फोटो असावा अशी शक्यता आहे. गोंदीयातील या वाघाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रवेश केला. त्याआधी कोल्हापूरातील बालिंगा येथे वाघाचे दर्शन असे फोटो कोल्हापूर परिसरात सोशल मीडियावर फिरले होते. अलिकडेच वैभववाडी तालुक्यातील नाधवडे धरणानजीक वाघाचे दर्शन म्हणून हाच फोटो व्हायरल झाल्याने वनविभागात खळबळ उडाली. नाधवडे परिसरात पट्टेरी वाघ असल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर पडल्यावर ग्रामस्थांत घबराट पसरली. त्यानंतर वन अधिकार्‍यांनी खातरजमा केल्यावर वाघाच्या अस्तित्वाबाबत कोणत्याच खुणा आढळून आल्या नाहीत.

गेले दोन दिवस वाघाच्या याच फोटोने सावंतवाडी तालुक्यातील व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर धुमाकूळ घातला आहे. प्रथम मळगाव परिसतात व आता नेमळे येथे राष्ट्रीय महामार्ग 17 वर पट्टेरी वाघाचे दर्शन या मथळ्याखाली वाघाचे फोटो व्हायरल होत आहेत. बालिंगा व नाधवडे येथे व्हायरल झालेल्या वाघाचा हा फोटो असुन अनेकांनी ग्रुपवर हा फेक फोटो असल्याचे  स्पष्ट करूनही पुन्हा पुन्हा तोच फोटो फॉरवर्ड केला जात आहे.

वाघाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यास बंदी 
फेसबुक असो की व्हॉट्सअ‍ॅप, वाघांचे आणि त्यांच्या शावकांचे फोटो हे कायमच लोकप्रिय असतात. मात्र, सोशल मीडियावर अशा प्रकारची वाघांची छायाचित्रे अधिकृतपणे टाकण्यावर  बंधने घालण्यात आली आहेत. वाघांची वस्तीठिकाणे उघड करणारी छायाचित्रे  सोशल मीडियावर टाकली जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिले आहेत.

देशभरातील वनविभागाच्या प्रमुखांना प्राधिकरणाने यासंदर्भातील पत्रे पाठविली आहेत. वाघांची विविध जंगलातील छायाचित्रे सातत्याने सोशल मीड्यिावर येत असतात. यामध्ये हौशी छायाचित्रकारांनी काढलेली अनेक छायाचित्रे असतात.वाघ किंवा अन्य वन्य जीवांची कॅमेरा मध्ये आलेली छायाचित्रे देखील सोशल मीड्यिातून व्हायरल होण्याचे प्रकार याआधी देखील अनेकदा घडले आहे. तशा घटनांची माहिती प्राधिकरणाकडेही आली आहे. अशा प्रकारच्या छायाचित्रांमुळे वनगुन्हे किंवा शिकारी घडण्यास प्रोत्साहन मिळू शकते, अशीही भिती प्रधिकरणाने आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. व्याघ्र संवर्धनाशी संबंधित जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, यांच्याही सोशल मीडियातील व्यवहारांची तपासणी वेळोवेळी केली गेली पाहिजे, असेही प्राधिकरणाने सुचविले आहे.