Wed, May 22, 2019 10:16होमपेज › Konkan › सावर्डेत कात उत्पादकांवर वनविभागाचे छापे

सावर्डेत कात उत्पादकांवर वनविभागाचे छापे

Published On: Aug 16 2018 10:51PM | Last Updated: Aug 16 2018 10:23PMचिपळूण : खास प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील शासकीय मालकीच्या जंगलातील खैराचे लाकूड तोडून त्याची सावर्डे विभागात वाहतूक करणार्‍या एकाला ठाणे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी पकडल्यानंतर दोन दिवस चिपळूण तालुक्यातील सावर्डे विभागात पाच कात उत्पादकांवर वनविभागाने छापे टाकले. यामध्ये कोट्यवधीचा चोरटा खैराचा साठा सापडल्याचे बोलले जात आहे. गेले दोन दिवस कोल्हापूर, ठाणे व रत्नागिरीतील वन विभागाच्या पथकांनी धाडसत्र सुरू केले असून चौकशी सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय मालकीच्या जागेतील खैर लाकूड चोरून वाहतूक होत असल्याची माहिती ठाणे वनविभागाला मिळाली. येथील अधिकारी विश्‍वास भडाळे यांना माहिती मिळताच त्यांनी गस्त घालून कोलाड येथे 16 टन खैराचे लाकूड ट्रकसह जप्‍त केले. 9 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली होती. तो ट्रक सावर्डे येथील इरफान खलपे यांचा होता. खलपे हा एजंटच्या माध्यमातून शासकीय मालकीचे खैर सावर्डेच्या दिशेने वाहतूक 

करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोलाड येथे ही कारवाई करण्यात आली. यानंतर खलपे यालाही अटक करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांत त्याच्यावरील ही दुसरी कारवाई असून या अनुषंगाने दि. 15 व 16 ऑगस्ट रोजी सावर्डे विभागातील सावर्डे, निवळी, पालवण येथील पाच कात उत्पादकांवर वन विभागाने छापे टाकले. याबाबतची माहिती ठाणे जिल्हा वन विभागीय अधिकारी संतोष सस्ते यांनी पत्रकारांना दिली. इरफान खलपे यांनी यापूर्वी सावर्डे, निवळी येथील कात उत्पादकांना खैर लाकूड दिल्याचे तपासात सांगितले आहे. यानुसार 15 ऑगस्ट रोजी ठाणे येथील वनविभागाचे पथक 15 रोजी चिपळुणात दाखल झाले. कोल्हापूर विभागीय वन अधिकारी प्रकाश बागेवाडी यांच्यासह पाच मोबाईल स्क्‍वॉड, 45 कर्मचार्‍यांच्या पथकाने धाडसत्र सुरू केले आहे. दोन दिवस टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये सचिन पाकळे यांची सचिन कात इंडस्ट्रिज, गजानन लोकरे यांची गजानन कात इंडस्ट्रिज, मनोज डिके यांची यश कात इंडस्ट्रिज, महेंद्र सुर्वे यांची ओंकार कात इंडस्ट्रिज व सुजित रेपाळ यांची रत्नसागर कात इंडस्ट्रिज या पाच व्यावसायिकांवर वनविभागाने छापे टाकले. यामुळे सावर्डे विभागात जोरदार चर्चा असून दोन दिवस येथील विभागीय वनाधिकारी विजयराज सुर्वे, चिपळूणचे वनक्षेत्रपाल सचिन निलख व कोल्हापूर, ठाणे येथील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकांत समावेश  आहे. 

याबाबत ठाणेचे अधिकारी संतोष सस्ते म्हणाले, वनविभागाने सावर्डे विभागातील पाच कात उद्योजकांवर छापे टाकले. शासकीय मालकीचा कात वाहतूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला इरफान खलपे याने दिलेल्या माहितीनुसारच ही कारवाई होत आहे. या पाचजणांची चौकशी सुरू असून चौकशीअंती आपण अहवाल देणार आहोत.