होमपेज › Konkan › वनरक्षकांचे कोल्हापुरात आंदोलन

वनरक्षकांचे कोल्हापुरात आंदोलन

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 9:52PM

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

राज्यभरातील वन विभागात कार्यरत असलेल्या वनरक्षक आणि वनपाल यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य वनपाल, वनरक्षक संघटनेतर्फे सोमवारी (दि. 11) कोल्हापूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्य वनसंरक्षण अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 70 वनपाल आणि वनरक्षक या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. गेल्या काही वर्षांतील संबंधित कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यानुसार अन्यायकारक वेतनश्रेणीत सुधारणा करणे, पोलिसांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळणे, तलाठ्यांप्रमाणे वेतन, प्रवास भत्त्यात वाढ, वन्यजीव विभागातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार्‍यांना विशेष भत्ता, वन संरक्षक काम करताना मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास नुकसानभरपाई, संप काळातील 11 दिवसांची रजा मंजूर करून वेतन देणे, आरोग्य व कुटुंब भत्ता, आहार भत्ता, समस्या निवारण सभा तीन महिन्यांनी घ्यावी आदी मागण्यांकडे  शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात संघटनेतर्फे तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. कोल्हापूर येथे मुख्य वनसंरक्षण अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. शासनाने या मागण्या तातडीने मान्य करून अन्याय दूर करावा, असे संघटनेने म्हटले आहे.